Pune : तीन तप लोटलेल्या मैत्रीला मिळाला उजाळा; मॉडर्न महाविद्यालयातील 1985 च्या बॅचचा जल्लोष

एमपीसी न्यूज – महाविद्यालयीन जीवन, तरुणाईत केलेला जल्लोष, परीक्षांचा घेतलेला ताण आणि त्याबरोबरच मित्रमैत्रिणींची खेचाखेची… याला तीन तप लोटली तरी त्या प्रत्येकाच्याच मनात मैत्रीचा ओलावा कायम होता. हा ओलावा जपत मागील चौतीस वर्ष प्रत्येकजण नोकरी व्यवसायात गढून गेला होता. पोलिस अधिकारी, बँकेतील अधिकारी, वकील, एल आयसीमध्ये उच्च पदांवर कार्यरत असलेली मंङळी तर कोणी व्यावसायिक अशा दीडशेच्या आसपास मित्रमैत्रिणींचा कट्टा पुन्हा एकदा जमला. निमित्त होते मॉडर्न महाविद्यालयातील 1985च्या बॅचच्या जल्लोष सोहळ्याचे.

वयाची पन्नाशी पार केलेल्या या सगळ्यांच्या मनात तेव्हाइतकीच हिरवाई आणि एकमेकांना भेटण्याची तेव्हापेक्षाही अधिक ओढ. याच ओढीतून जुन्या मित्रमैत्रिणींना एकत्र आणण्याचे काम बिपीन पाटोळे, किरण सणस, कमलेश बोकील, कृती नांगरेचा, नमिता उंबरेकर-कुलकर्णी यांनी केले, तर उदय बराटे, पराग वडगावकर, अजय माडीवाले, हेमंत पत्की, नंदू पारसनीस आदींनी मनोरंजनाच्या कार्यक्रमात रंग भरले आणि अवघ्या महिनाभरात नियोजन करून सर्वांना एकत्र आणले.

  • महाविद्यालयीन जीवनातील आठवणींना उजाळा देत असतानाच एकमेकांच्या मदतीसाठी आपण एकमेकांच्या उपयोगी कसे पडू शकतो यावर केवळ चर्चाच नाही, तर कृती करण्याचेही या मंडळींनी ठरवून टाकले. इतक्या वर्षांनी भेटलेल्या आपल्याच मित्रमैत्रिणींमध्ये झालेले बदल निरखत असतानाच त्यांची तेव्हाची प्रतिमा अनेकांच्या डोळ्यासमोर होती. त्यांच्यात झालेल्या बदलानंतर त्यांची ओळख करून घेताना प्रत्येकाच्याच चेहऱ्यावर आश्‍चर्यकारक भाव होते. पुण्या-मुंबईतील मित्रमैत्रिणींच्या बरोबरीनेच दिल्ली, इंदूर, चैन्नईहून आलेल्या मित्रांबरोबरच मैत्रिणींनीही आवर्जून या कार्यक्रमाला हजेरी लावली होती.

अनेकांच्या आयुष्यात घडलेल्या आनंददायी घटनांप्रमाणेच, विस्मयकारक घटना ऐकताना सगळे जुने आणि जाणते झालेले महाविद्यालयीन विद्यार्थी रमून गेले होते. या वेळी प्रत्येकाने आपापल्या कलागुणांना वाव देऊन आपल्या मित्रमैत्रिणींसाठी सदाबहार कार्यक्रमही सादर केला आणि निरोप घेताना परत परत भेटण्याचे अभिवचन एकमेकांना दिले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.