Chinchwad :  वाहतूक, गुन्हेगारीसह विविध विषयांवर पिंपरी-चिंचवडकरांनी पोलीस आयुक्तांना विचारले थेट प्रश्न

 पोलीस आयुक्तांनी साधला नागरिकांशी संवाद

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी ट्विटरद्वारे पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांशी शुक्रवारी (दि. 5) सायंकाळी ट्विटरवर लाईव्ह येत संवाद साधला. (Chinchwad) या संवादात नागरिकांनी शहरातील वाहतूक व्यवस्था, गुन्हेगारी, पोलीस ठाणे आणि चौक्यांचे बळकटीकरण, प्रतिबंधात्मक कारवाया आणि अन्य विविध विषयांवर प्रश्न उपस्थित केले. काहींनी पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक केले तर काहींनी पोलीस व्यवस्था सुधारण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले. या संवादात एका पठ्ठ्याने तर असंबंद्ध प्रश्नांची भलीमोठी यादीच पोस्ट केली. त्यावर आयुक्तांनी देखील “त्याचं उत्तर एलन मस्कला विचार” असा सल्ला दिला.

शहराला प्रथमच मिळाले आयआयटीयन पोलीस आयुक्त 

पिंपरी-चिंचवड शहराला प्रथमच आयआयटीची पार्श्वभूमी असलेले पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या रूपाने मिळाले आहेत. शहरातील पोलिसिंगच्या बाबतीत उपयोग काही बदल करणे आवशयक असल्याचे प्रतिक कारंजे यांनी सुचवले. त्यावर आयुक्तांनी आपल्या तांत्रिक ज्ञानाचा वापर औद्योगिक वसाहती आणि आयटी नगरी असलेल्या शहरासाठी होईल, अशी आशा व्यक्त केली.

शहरातील गुंडगिरी आणि कोयता गॅंगचा प्रतिबंध करा

शहरातील कोयता गॅंग आणि गुंडगिरी करणाऱ्या गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याची मागणी विशाल दवणे यांनी केली. त्यावर पोलिसांनी आयुक्तांनी थेट आकडे सादर करत सांगितले कि, (Chinchwad) मागील चार महिन्यात एकूण 59 शस्त्रे व 276 कोयते जप्त करण्यात आले आहेत. तसेच 135 कुख्यात गुंडांवर मोक्का व एमपीडीए अंतर्गत करवाई करण्यात आली आहे. भविष्यात अशीच कडक कारवाई चालू राहील.

विरुद्ध दिशेची वाहतूक जोखमीची

पुणे-नाशिक महामार्गावर पांजरपोळ येथे अनेक वाहन चालक विरुद्ध दिशेने वाहने चालवतात. यात चारचाकी आणि स्कूल बस देखील असतात, असे श्रीकांत यांनी सांगितले. त्यावर आयुक्तांनी उत्तर दिले. पांजरपोळ येथे नियमभंग करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मागील काही दिवसात तीन हजार वाहन चालकांवर विरुद्ध दिशेने वाहने चालविल्या बाबत कारवाई करण्यात आली आहे.

बुलेटचे फटाके त्रासदायक

बुलेटचे फटाके फोडत जाणाऱ्यांवर कारवाई करा. विशेषतः जे रात्री 10 नंतर फोडतात. त्यांना तर चांगलाच प्रसाद द्या, असे एन के यांनी सांगितले. आयुक्त म्हणाले, “कारवाई जोरात चालू आहे. प्रसाद नाही पण चालान दिले जात आहे. या वर्षी 350 पेक्षा अधिक जणांवर कारवाई करुन सायलेन्सर जप्त करण्यात आले आहेत.”

बॅचलर शेजाऱ्यांचा त्रास होतोय

संदीप भामरे यांनी बॅचलर शेजाऱ्यांचा त्रास होत असेल तर कायद्यात काही तरतूद आहे का, असे विचारले. त्यावर आयुक्तांनी केवळ 112 क्रमांकवर संपर्क करण्याची विनंती केली.

त्या प्रश्नांची उत्तरं एलन मस्कला विचार

निलेश बोराटे यांनी दोन पानांवर प्रश्न टाईप करून ते पोलीस आयुक्तांना ट्विट केले. त्यात शहरातील पोलिसिंगशी संबंधित एकही प्रश्न नव्हता. ताऱ्यांची निर्मिती कशी होते. डोंगरावर उगवणाऱ्या गवताचे आयुष्य किती असते, अशा प्रकारचे प्रश्न होते.
तुम्ही चुकीच्या ठिकाणी प्रश्न विचारले आहेत. हे प्रश्न नासा, एलन मस्क अथवा चॅट जीपीटी कडे विचारण्याचा सल्ला पोलीस आयुक्तांनी दिला.

हिंजवडी वाहतूक विभागात अनेक समस्या

वाहतुकीचे प्रश्न सोडविण्यासाठी हिंजवडी वाहतूक विभाग पूर्णतः अपयशी ठरला असल्याची तक्रार राकेश यांनी केली. त्यावर हिंजवडी परिसरात अनेक संस्था संयुक्तपणे काम करत आहेत. त्यांच्या सोबत पोलीस देखील सर्वसमावेशकपणे काम करत असल्याचे आयुक्तांनी सांगितले.(Chinchwad) त्याचबरोबर योगेश जोशी यांनी हिंजवडी आयटी पार्क मध्ये पीक अवर्स मध्ये अवजड वाहनांना प्रवेश बंद करण्याचा सल्ला दिला. या सल्ल्याची अंमलबजावणी करण्याच्या सूचना आयुक्तांनी वाहतूक विभागाला दिल्या आहेत.

तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्याचा प्रयत्न

विदेशातील पोलिसांकडून कोणती गोष्ट शिकून ती शहरात लागू करण्यासारखी आहे, असा प्रश्न अमित आवारे यांनी उपस्थित केला. या प्रश्नाचे आयुक्तांनी कौतुक केले. पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी उत्तर देताना म्हटले कि, मी नेदरलँड येथील भारतीय दूतावासात काम करत असताना तिथे होणारा तंत्रज्ञानाचा वापर अतिशय प्रभावी वाटला. तंत्रज्ञानाचा वापर प्रभावीपणे पिंपरी चिंचवड शहरात करण्याचा मानस आहे.”

सायबर गुन्हेगारीबाबत जनजागृती करा

वाढत्या सायबर गुन्ह्यांबाबत पोलिसांकडून व्हिडीओच्या माध्यमातून जनजागृती केली जावी, अशी मागणी सोलो ट्रॅव्हलर या ट्विटर खाते धारकाने केली. सायबर गुन्हेगारीबाबत जनजागृती केली जात असून त्याबाबतचे व्हिडीओ ट्विटरवर देखील पोस्ट केले जातील, असे आयुक्तांनी सांगितले.

चाकण मधील वाहतूक सुरळीत होतेय

चाकण मधील वाहतूक सुरळीत होत आहे. त्याबद्दल सुनील भोंग यांनी कौतुक केले. याचे श्रेय पोलीस आयुक्तांनी चाकण वाहतूक विभागाचे सहायक पोलीस निरीक्षक मछिंद्र आदलिंग यांना दिले. तसेच फीडबॅकसाठी सुनील भोंग यांचे आभार मानले.

दंडात्मक कारवाईवर पोलिसांचा भर

पोलिसांचा दंडात्मक कारवाईवर अधिक भर आहे. त्याबाबत काहीतरी करा, अशी सूचना संदीप शिंदे यांनी केली. त्यावर पोलीस आयुक्तांनी, “नियमभंग करणाऱ्यांना दंड… आणि वाहतूक नियमनासाठी कटिबद्ध…!!” अशी प्रतिक्रिया दिली.

फॅन्सी नंबर प्लेट जप्त करा

मोठा आवाज करणारे सायलेन्सर जसे जप्त करता, तसेच फॅन्सी नंबर प्लेट देखील जप्त करण्याची मागणी श्रीकांत चव्हाण यांनी केली. त्यावर पोलीस आयुक्तांनी फोटो पोस्ट करत फॅन्सी नंबर प्लेट देखील जप्त करत असल्याचे सांगितले.

आठवड्याचा संवाद नको नियंत्रण कक्षाला संपर्क करा

प्रतीक नाईक यांनी प्रत्येक आठवड्याला नागरिकांशी संवाद साधण्याची विनंती केली. त्यामुळे नागरिकांना त्यांच्या कल्पना आणि प्रश्न पोलिसांपुढे मांडता येतील, असे नाईक यांनी म्हटले. त्यावर पोलीस आयुक्तांनी त्यांच्या ट्विटर आणि पिंपरी-चिंचवड पोलीस नियंत्रण कक्षाशी संपर्क साधण्याचे आवाहन केले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.