Chinchwad : पिंपरी-चिंचवड वाहतूक नियंत्रण कक्षाचा संपर्क क्रमांक अजूनही ‘नॉट अव्हेलेबल’!

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड पोलिसांच्या वाहतूक मुख्यालयाचे पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांच्या हस्ते उदघाटन झाले. वाहतूक विभाग चिंचवडगाव येथील स्वर्गीय अशोक कामठे बसस्थानकाजवळ असलेल्या व्यापारी संकुलात स्थलांतरित झाला आहे. वाहतूक विभाग सुरू होऊन दहा महिने झाले तरी फोन क्रमांक उपलब्ध नाहीत. त्यामुळे सध्या पिंपरी-चिंचवड वाहतूक नियंत्रण कक्षाचा संपर्क क्रमांक ‘नॉट अव्हेलेबल’ अशीच स्थिती आहे.

पोलीस आयुक्तालय सुरू होऊन एक वर्ष उलटले. अद्याप आयुक्तालयात अनेक विभाग सुरू झालेले नाहीत. मनुष्यबळ आणि अन्य कारणे सांगून या विभागांची स्थापना रखडली आहे. अति वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि राजकीय मंडळी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे बोलले जात आहे.

  • पहिले पोलीस आयुक्त म्हणून कार्यभार सांभाळलेले आयुक्त आर. के. पद्मनाभन यांनी आयुक्तालयाची घडी बसवली आहे. आयुक्तालयाचा कारभार सुरळीत चालल्याचे दिसत असले तरी अडचणी अजूनही संपलेल्या नाहीत. वाहतूक नियंत्रण कक्ष सुरू होऊन दहा महिने उलटले तरी अद्याप फोन क्रमांक मिळालेले नाहीत. यामुळे नागरिकांना वाहतूक पोलिसांशी संपर्क करण्यात अडचणी येत आहेत.

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाचा मुख्य नियंत्रण कक्ष, वाहतूक पोलिसांच्या चॅनेलवरून आणि आयुक्तालयाच्या ट्विटरवर आलेल्या कॉलचे सध्या निरसन केले जात आहे. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या ट्विटर अकाउंटचे प्रोफाइल नाव Pimpri Chinchwad Police असे आहे. तर @PCcityPolice असे ट्विटर अकाउंटचे नाव आहे.

  • सहाय्यक पोलीस आयुक्त नीलिमा जाधव म्हणाल्या, “फोन क्रमांकासाठी आवेदन दिले आहे. फोन क्रमांक मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. सध्या कर्मचाऱ्यांच्या फोनवरून देखील नागरिकांच्या सूचना आणि माहिती घेतली जात आहे. लवकरच संपर्क क्रमांक सुरू होतील.”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.