Chinchwad : ‘साहेब, आमचा शेजारी सारखा खोकतोय’ ; पोलीस नियंत्रण कक्षात दिवसाला सरासरी 75 ते 80 कॉल

एमपीसी न्यूज – ‘करोना’मुळे सध्या शहरातील गुन्ह्यांचे प्रमाण खूपच कमी झाले आहे. गुन्हे कमी झाले की पोलिसांचे काम कमी होते, असे म्हटले जाते. पण सध्या काम कमी झाले असले तरी ताण मात्र वाढतच आहे. कारण पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्‍तालयातील नियंत्रण कक्षात दिवसाला सरासरी 75 ते 80 फोन येत आहेत. यामध्ये गर्दी केली, आमचा शेजारी सारखा खोकतोय आणि अन्य विविध प्रकारच्या तक्रारी करणारे फोन येत आहेत. यामुळे पोलिसांची चांगलीच दमछाक होत आहे.

गुन्हेगारांऐवजी सर्वसामान्य नागरिकांना आवरण्यात आणि घरी पाठविण्यातच पोलिसांचा वेळ जात आहे. त्यातच नियंत्रण कक्षात रोज 70 ते 80 फोन येत असल्याने पोलिसांची धावपळ वाढली आहे. आतापर्यंत साडे तीन हजार जणांवर गुन्हे दाखल करुनही विनाकारण फिरणाऱ्यांच्या मागे पोलिसांना धावावे लागत आहे. करोनाचा प्रसार रोखण्यासाठी लॉकडाऊन, संचारबदी लागू केली आहे. लॉकडाऊन आणि संचारबंदीची घोषणा केल्यानंतर सुरवातीच्या काळात सूचना देऊनही दुकाने व कार्यालये सुरू ठेवणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला. पोलिसांनी कारवाई करूनही आत्तापर्यंत विनाकारण फिरणाऱ्यांची संख्या कमी होताना दिसत नाही. या कालावधीत प्रशासनाच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या तीन हजार 511 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

नागरिक ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याने पोलिसांनी आपल्या कारवाईचा वेग आणखी वाढविला आहे. सोमवारी (दि. 13) आत्तापर्यंतची एका दिवसातील सर्वात मोठी कारवाई केली. पिंपरी चिंचवड पोलिसांनी सोनवरी 224 जणांवर कारवाई केली आहे. आत्तापर्यंत पोलिसांनी तीन हजार 511 जणांवर भारतीय दंड विधान कलम 188 अन्वये कारवाई करण्यात आली आहे.

दीड हजार वाहने जप्त

संचारबंदीच्या काळात मोकाट फिरणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई करण्यास सुरवात केली. मात्र फिरणाऱ्यांची संख्या कमी होत नसल्याने पोलिसांनी पेट्रोल पंप चालकांना सूचना देऊन फक्‍त अत्यावश्‍यक सेवेतील वाहनांना ओळखपत्र पाहून इंधन देण्याच्या सूचना दिल्या. तरीदेखील दुचाकीवरून फिरणाऱ्यांची संख्या कमी होताना दिसत नव्हती. अखेर पोलिसांनी वाहन जप्तीचे अस्त्र उचलले. सुरुवातीला वाकड पोलिसांनी एकाच दिवशी 50 तर चिखली पोलिसांनी 27 वाहने जप्त केली. त्यानंतर विविध पोलीस ठाण्यांमध्ये आत्तापर्यंत एक हजार 449 वाहने जप्त केल्याची नोंद आहे.

मास्क न वापरणाऱ्या 167 जणांवर पोलिसांकडून कारवाई

मास्क वापरल्यास करोनाचा प्रसार रोखण्यास मदत होते. यामुळे सर्व नागरिकांनी घराबाहेर पडताना मास्क वापरणे शासनाने बंधनकारक केले आहे. मात्र तरीही अनेकजण मास्कशिवाय सार्वजनिक ठिकाणी फिरत असल्याचे दिसून आले आहे. मास्क न वापरणाऱ्यांच्या विरोधात गेल्या चार दिवसात विविध पोलीस ठाण्यांमध्ये 167 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.