Chinchwad : ‘गुरुकुलम’च्या विद्यार्थ्यांनी लुटला सांगीतिक मैफलीचा आनंद

एमपीसी न्यूज – पुनरुत्थान समरसता गुरुकुलम् मधील (Chinchwad) भटक्या विमुक्त विद्यार्थ्यांनी जय मल्हार थिएटर्स प्रस्तुत ‘गीत बहार’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून मंगळवार (दि.26) सांगीतिक मैफलीचा मनमुराद आनंद लुटला.

पुनरुत्थान समरसता गुरुकुलम् अंतर्गत महाराणा प्रताप गौशाळेच्या सभागृहात क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती अध्यक्ष पद्मश्री गिरीश प्रभुणे, उपाध्यक्ष ज्येष्ठ वैज्ञानिक डॉ. अशोक नगरकर, नितीन बारणे, गोशाळा प्रमुख हेमाराम चौधरी, आरती शिवणीकर, ज्येष्ठ कवयित्री शोभा जोशी, प्रदीप गांधलीकर आदी उपस्थित होते.

ज्येष्ठ लेखिका आणि गायिका शुभांगी मुळे तसेच गायक हेमंत वाळुंजकर यांनी मराठमोळ्या भावगीत, भक्तिगीत, लोकगीत, लावणी आणि अभिजात चित्रपटगीत या प्रकारातील एकल आणि युगुलगीतांचे सुरेल सादरीकरण करून मुलांची मने जिंकली.

कार्यक्रमाचा प्रारंभ गणेश स्तवनाने करण्यात आला. “माझी रेणुका माउली…” , गदिमा रचित “विठ्ठला तू वेडा कुंभार…” , (Chinchwad) “कबिराचे विणतो शेले…” , “विकत घेतला श्याम…” , “शंभो शंकरा…” या गीतांना विद्यार्थ्यांनी योग्य ठिकाणी दिलेली दाद गायकांना खुलवत गेली.

Pimpri : एचए स्कूलच्या दोन खेळाडूंना थाई बॉक्सिंगमध्ये सुवर्ण पदक

तर “नाच रे मोरा आंब्याच्या वनात…” आणि “झुकुझुकु आगीनगाडी…” या बालगीतांवर बच्चे कंपनी इतकी बेहद्द खूष झाली की, टाळ्यांचा ठेका धरून त्यांनी सामुदायिक गायन साथ दिली. “मन उधाण वाऱ्याचे…” या गीताने उपस्थितांना आनंदाचे उधाण आले; तर “धुंदी कळ्यांना…” ऐकताना मनाची अवस्था धुंद झाली.

“बुगडी माझी सांडली गं…” या लावणीवर मुलांनी उत्स्फूर्तपणे नाच केला. “शारद सुंदर चंदेरी राती…” मुळे खरोखरच सुंदर झालेल्या मैफलीची सांगता “आमुची जेजुरी जेजुरी…” या वाघ्या-मुरळीच्या पारंपरिक लोकगीताने करण्यात आली. जयंत साने, मोहन पारसनीस, हेमंत पोटफोडे या वादकांनी नेटकी साथसंगत केली.

तर नीना भेडसगावकर यांच्या संहितालेखन आणि निवेदनामुळे मैफल अधिकच बहारदार झाली. यावेळी सभागृहाबाहेर कोसळणाऱ्या पावसाच्या जोरदार सरी आणि आतमध्ये सुरांचा स्वराभिषेक यामुळे वातावरणात आल्हाददायक गारवा निर्माण झाला होता.

उदय खामकर, मारुती वाघमारे, सतीश अवचार तसेच गुरुकुलम् मधील शिक्षकवृंद आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी संयोजनात परिश्रम घेतले. गिरीश प्रभुणे यांनी, “या विद्यार्थ्यांनी आपल्या आयुष्यात पहिल्यांदाच अशा मैफलीचा अनुभव घेऊन मनापासून त्यांचा आनंद लुटला. त्यामुळे सर्व कलाकारांना मी धन्यवाद देतो!” अशा शब्दांत आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.