Pimpri News: सुरक्षा विभागाच्या उपायुक्त, सुरक्षा अधिका-याला आयुक्तांची ‘सक्त’ ताकीद

एमपीसी न्यूज – महापालिकेच्या मिळकती, इमारतीची सुरक्षा करण्यासाठी विविध सुरक्षा एजन्सीमार्फत नेमलेल्या खासगी सुरक्षारक्षकांच्या कामकाजात विविध त्रुटी आढळून आल्या आहेत. नोंदणीनुसार कर्मचारी कामावर गैरहजर, त्यांची जागी अन्य व्यक्तीची नेमणूक, गणवेश परिधान न करणे, ओळखपत्र नसने, महापालिकेचे बनावट ओळखपत्र असल्याचे पाहणीत आढळून आले. त्यामुळे सुरक्षा विभागाच्या कामावर प्रभावी व सक्षम नियंत्रण नसल्याचा ठपका ठेवत विभागाच्या उपायुक्त आणि सुरक्षा अधिका-याला आयुक्त राजेश पाटील यांनी सक्त ताकीद दिली आहे.

सुरक्षा विभागाच्या उपायुक्त आशादेवी दुरगुडे, सुरक्षा अधिकारी उदय जरांडे यांना सक्त ताकीद दिली. दुरगुडे या उपायुक्त आणि जरांडे मुख्य सुरक्षा अधिकारी या गट ‘अ’ दर्जाच्या महत्वाच्या व जबाबदारीच्या पदावर कार्यरत आहेत. महापालिकेच्या मिळकती, इमारतीची सुरक्षा करण्यासाठी विविध सुरक्षा एजन्सीमार्फत खासगी सुरक्षारक्षक, मदतनीसांची नेमणूक करण्यात आली आहे. सुरक्षारक्षकांच्या कामकाजाविषयी दक्षता व नियंत्रण कक्षामार्फत 9 सप्टेंबर 2021 रोजी तपासणी करण्याक आली. त्यामध्ये त्रुटी व उणिवा निदर्शनास आले. त्यामुळे दुरगुडे, जरांडे यांना कारणे दाखवा नोटीस बजावून खुलासा मागविण्यात आला होता.

सुरक्षा विभागामध्ये सद्यस्थितीत कार्यरत असलेले सुरक्षा निरीक्षक, सुरक्षा सुपरवायझर या पदावरील कर्मचा-यांना वायसीएम रुग्णालय, जम्बो कोविड सेंटर येथे तीन्ही पाळ्यामध्ये ड्युट्या असल्याने महापालिका मिळकतीवरील तपासणी करण्याकामी अडथळा, दिरंगाई निर्माण झाल्याचे त्यांनी खुलाशात कबुल केले. यापुढे अशा स्वरुपाच्या त्रुटी आढळणार नसल्याची ग्वाही दिली. सुरक्षा एजन्सीमार्फत नेमलेल्या रखवालदारांच्या मदतनीसांच्या कामकाजाची दक्षता व नियंत्रण कक्षामार्फत तपासणी केली. त्यामध्ये प्रत्यक्ष पाहणीत नोंदीनुसार कर्मचारी उपस्थित नसणे, महापालिकेचे बनावट ओळखपत्र असणे, सतत गैरहजर असणे अशा गंभीर स्वरुपाच्या त्रुटी आढळून आल्या.

त्यामुळे दुरगुडे आणि जरांडे यांचे सुरक्षा विभागाच्या कामकाजावर प्रभावी व सक्षम नियंत्रण नसल्याचे सकृतदर्शनी दिसून येत आहे. त्यांनी पर्यवेक्षकीय कर्तव्यामध्ये कसूर केली. त्यांना केलेला खुलासा आणि तपासणी आढलेल्या त्रुटी विचारात घेता एकवेळ संधी म्हणून दुरगुडे, जरांडे यांना सक्त ताकीद दिली आहे. यापुढे भविष्यात सुरक्षा विभागाच्या कामकाजात अशा स्वरुराची अनियमितता आढल्यास कडक व जबर शास्ती कारवाईचा इशारा दिला आहे. तसेच या आदेशाची त्यांच्या सेवा पुस्तकात नोंद करण्याचा आदेश दिला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.