Bhosari News : भोसरी आणि निगडी मध्ये साडेचार लाखांचा गुटखा पकडला

एमपीसी न्यूज – सामाजिक सुरक्षा विभागाने भोसरी येथे दोन तर निगडी येथे एक कारवाई करत चार लाख 54 हजारांचा गुटखा पकडला आहे. तीन कारवायांमध्ये पोलिसांनी एकूण सहा लाख 55 हजार 801 रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.

फुगे चाळ भोसरी येथे पहिली कारवाई केली. गिता प्रोव्हिजन स्टोअर्स या दुकानात शारदा गजानन रहाणे या महिलेने प्रतिबंधीत तंबाखूजन्य गुटखा विक्रीसाठी साठवून ठेवला होता. पोलिसांनी दुकानातून 39 हजार 116 रुपयांचा गुटखा, 2400 रुपये रोख रक्कम असा एकूण 41 हजार 516 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. महिलेच्या विरोधात भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लांडगे वस्ती, भोसरी येथे सामाजिक सुरक्षा विभागाने दुसरी कारवाई केली. लांडगे वस्ती येथे अभिजीत उर्फ पप्पू भोर हा प्रतिबंधीत गुटखा विक्री करण्यासाठी कार मधून नेताना आढळला. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने आणखी गुटखा नवनाथ लांडगे याच्या रुममध्ये ठेवल्याचे सांगितले. या कारवाईमध्ये पोलिसांनी एक लाख 600 रुपयांचा गुटखा आणि एक लाख 20 हजार रुपयांची कार असा एकूण 2 लाख 20 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी अभिजित आणि नवनाथ या दोघांच्या विरोधात भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सामाजिक सुरक्षा विभागाने तिसरी कारवाई साईनाथनगर, निगडी येथे केली. उत्तम वाघमारे हा प्रतिबंधीत गुटखा मोटरसायकलवर वाहतूक करताना पोलिसांना आढळला. त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून 3 लाख 15 हजार 145 रुपयांचा गुटखा, साडेआठ हजार रोख रक्कम आणि 70 हजारांची एक दुचाकी असा एकूण 3 लाख 93 हजार 685 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तिघांच्या विरोधात याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यातील उत्तम याला पोलिसांनी अटक केली आहे.

मरकळ येथे जुगार अड्ड्यावर छापा

सामाजिक सुरक्षा विभागाने आळंदी पोलीस ठाण्याच्या हद्दीत मरकळ येथे कल्याण मटका जुगार अड्ड्यावर छापा मारला. त्यात तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून 12 हजार 320 रोख रक्कम आणि 10 रुपयांचे मटका जूगार खेळण्याचे साहित्य असा एकूण 12 हजार 330 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी सांतोष मारुती जठार आणि त्याच्या तीन साथीदारांच्या विरोधात महाराष्ट्र जूगार कायदा कलम 12 (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.