Chakan : गुन्हेगारीवर नियंत्रणाचे पोलिसांसमोर आव्हान; चाकण औद्योगिक परिसरातील स्थिती

एमपीसी न्यूज : पुणे ग्रामीण मधून चाकण पोलीस स्टेशनचा (Chakan) समावेश पिंपरी-चिंचवड आयुक्तालयात झाल्यानंतर गुन्हेगारी आटोक्यात येईल अशी अपेक्षा होती. परंतु चाकण शहर आणि लगतची गावे व औद्योगिक भागातील गुन्हेगारीचे सत्र थांबतांना दिसत नाही. मागील काही काळात गुन्हेगारी टोळक्यांनी पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. एक खुनाच्या बदल्यासाठी दुसरा खून, हल्ल्यांमध्ये पिस्तुलाचा खेळण्यासारखा होणारा वापर, गंभीर हाणामाऱ्या, खुलेआम विनयभंग व रोडरोमिओंकडून महिला व मुलींना त्रास देण्याच्या घटनांनी शहरातील नागरिक असुरक्षित असल्याची भावना व्यक्त करत आहेत.

चाकण औद्योगिक भागातील वाढत्या गुन्हेगारीला वेगाने वाढणाऱ्या लोकसंखेसह अन्यही अनेक कारणे आहेत. गुन्ह्यांचा खराखुरा तपास लावण्यात पोलीस यंत्रणेला येणारे अपयश, गुन्हे घडू नयेत म्हणून प्रतिबंधात्मक कारवाया करताना होणारा राजकीय हस्तक्षेप, विविध स्वरूपाच्या गुन्ह्यात अटक केलेल्या आरोपींची पुराव्याअभावी होणारी सुटका ही प्रमुख कारणे सुद्धा समोर येत आहेत. पोलिस यंत्रणा गुन्हेगारी रोखण्यात आणि दाखल झालेल्या गुन्ह्यांच्या तपासकामात, आणि गुन्हेगारीचा संपूर्ण बिमोड करण्यात कमी पडते असा आरोप सामान्य नागरिकांकडून होत आहे.

युवकांच्या टोळ्याअंतर्गत युवकांची विभागणी झाल्याचे चित्र समोर येत आहे. बऱ्याच गुन्ह्यांची कल्पना पोलिसांना असूनही सूत्रधारापर्यंत ते कसे पोहोचत नाहीत, त्यांना जरब का बसविली जात नाही, अल्पवयीन युवकांच्या खेड तालुक्यातील चाकण आणि आळंदी भागातील कोयता गँग निरनिरळ्या ग्रुपच्या माध्यमातून निर्माण झालेल्या टोळ्या अत्यंत गंभीर गुन्हेगारीकडे जात असताना त्या टोळ्या नामशेष करण्याचे धारिष्ट्य खेड तालुक्यात पोलीस प्रशासन का दाखवीत नाहीत असा सामान्य नागरिकांचा सवाल आहे.

Chakan : हॉटेलमध्ये घुसून गोळीबार; एक जखमी तर तिघांवर गुन्हा

धक्कादायक म्हणजे यातील गुन्हेगारी प्रवृतीच्या युवकांच्या वेगवेगळ्या (Chakan) अवैध धंद्यांना प्रशासन अर्थपूर्ण पाठबळ देत असल्याचे अत्यंत धक्कादायक आरोप सामान्य नागरिक करत आहेत.

पिंपरी चिंचवड आयुक्तालयाच्या गुन्हे शाखेने आणि स्थानिक पोलीस प्रशासनाने हातभट्या उध्वस्त करण्यावरच भर दिला आहे. मागील महिना भरात जवळपास दररोज अशा कारवाया करण्यात आल्या आहेत. मात्र कितीही कारवाया केल्या तरी पुन्हा-पुन्हा धगधगणाऱ्या अनेक हातभट्ट्या आजही खुलेआम या भागात सुरूच आहेत. शिवाय चाकण आणि महाळुंगे परिसरात खुलेआम गावठी दारू, ढाबे आणि हॉटेल्स मधून अवैध दारूची विक्री, मटका, जुगार, गांजा, बेकायदा गॅस रिफिलिंग, असे अनेक अवैध धंदे जोरात चालू आहेत.

उपाययोजनांची गरज :

चाकण शहर आणि एमआयडीसी मधील वाढती (Chakan) गुन्हेगारी आणि गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाच्या माध्यमातून वेगवेगळ्या उपाययोजना करण्याची गरज आहे. आयुक्तालयात समावेशानंतर चाकण आणि महाळुंगे येथील पोलीस बळ वाढले आहे. व्हिजिबल पोलिसिंग दिसू लागले आहे. मात्र चाकण औद्योगिक परिसरातील घडणार्‍या गुन्ह्यांचा आकडा मात्र कमी होताना दिसत नाही.

खेड तालुक्यातील काही टोळ्यांमध्ये वर्चस्वावरून खुनी हल्ले सुरु आहेत. ठिकठिकाणी रेकॉर्डवरील गुन्हेगारांचाच सुळसुळाट सुरू असल्याचे वास्तव पोलीसांकडे दाखल झालेल्या गुन्ह्यांच्या आकडेवारीतून समोर येत आहे. गुन्हेगारी तरुणांच्या टोळ्यांवर ठोस कारवाई करून गुन्हे रोखण्यासाठी उपाययोजना करण्याचे आव्हान चाकण औद्योगिक भागातील पोलिसांच्या समोर आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.