Cyrus Mistry : गाडीच्या वेगाबाबत विचार करण्याची वेळ आली आहे – शरद पवार

एमपीसी न्यूज : टाटा समूहाचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री (Cyrus Mistry) यांचे रविवारी अपघातात निधन झाले. या घटनेने उद्योग जगतासह सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. सायरस मिस्त्री यांच्या निधनानंतर अनेकांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील त्यांना श्रद्धांजली वाहिली. मात्र, श्रद्धांजली वाहत असताना शरद पवार यांनी काही परखड मत देखील व्यक्त केले. या अपघातानंतर आपणा सर्वांना गाडीच्या वेगावर नियंत्रण मिळवण्यासंबंधी विचार करण्याची वेळ आली असल्याचे ते म्हणाले.

सायरस मिस्त्री यांना श्रद्धांजली वाहताना पवार म्हणाले, सायरस मिस्त्री यांचे अशा प्रकारे निधन धक्कादायक आहे. देशातील औद्योगिक क्षेत्राची ही मोठी हानी आहे. हा अपघात आपल्या सर्वांना काहीतरी शिकवत आहे. चांगले रस्ते हे जमेची बाजू आहेतच. मात्र, चांगले रस्ते म्हणून गाडीच्या वेगावरच्या नियंत्रण संबंधी कुठेतरी विचार करण्याची वेळ आली असल्याचे ते यावेळी बोलताना म्हणाले.

Corus India Company : टँकरच्या धडकेत तरुण कामगार ठार

ते पुढे बोलताना म्हणाले, महाराष्ट्रात किंवा देशात काही पारशी कुटुंब अशी होती, जी प्रसिद्धीपासून बाजूला राहून विविध क्षेत्रात देशाच्या विकासामध्ये योगदान देत होते. ह्या पारशी कुटुंबांची नावे नजरेसमोर ठेवली तर त्यांच्यामध्ये प्रसिद्ध नसलेले पण अत्यंत महत्त्वाचे कुटुंब म्हणजे शापूरजी पालनजी. शापूरजी पालनजी मिस्त्री यांनी महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्या औद्योगिकीकरणामध्ये, विविध प्रकल्पांमध्ये अत्यंत मोलाचे योगदान दिले.

एक काळ असा होता की, टाटा ग्रुपमध्ये टाटांच्यापेक्षा शापूरजी पालनजी ग्रुपची अधिक भांडवली गुंतवणूक होती. नंतरच्या काळामध्ये टाटांची गुंतवणूक वाढली. शापूरजी पालनजी मिस्त्री यांच्यानंतरची पिढी म्हणजे सायरस मिस्त्री. तरुण पिढीचे प्रतिनिधित्व सायरस करत होते. ते अनेक वर्ष टाटाच्या बोर्डावर होते. मध्यतंरी रतन टाटा यांनी जबाबदारीतून मुक्त होण्याचा निर्णय घेतल्यानंतर टाटाचे प्रमुखपद सायरस मिस्त्री (Cyrus Mistry) यांच्याकडे आले.

सायरस मिस्त्री हे अधिक कष्ट करणारे, व्यवसायामध्ये अत्यंत बारकाईने लक्ष देणारे असे गृहस्थ होते. त्यांना टाटाचे नेतृत्व करण्याचा थोडा काळ मिळाला. या काळात सुद्धा त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारची कामगिरी केली. दुर्दैवाने त्यांच्या सहकाऱ्यांमध्ये एकवाक्यता राहिली नाही, त्यामुळे त्यांना ते पद सोडावे लागले. तेव्हापासून ते बाकीच्या गोष्टींपासून दूर राहिले. त्यांचा अपघात हा प्रचंड धक्कादायक आहे. ज्या पद्धतीने त्या गाडीचा अपघात झाल्याचे ऐकायला मिळाले, त्यावरून असे काही घडेल यावर विश्वासच बसत नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.