Dighi : अठरा दिवसांपासून बेपत्ता असलेल्या तरुणाचा मृतदेह सापडला

एमपीसी न्यूज – अठरा दिवसांपासून बेपत्ता असलेल्या तरुणाचा मृतदेह दिघी येथील डोंगरांमध्ये आढळला. जुन्या वादातून त्याचा खून केल्याचा प्रकार समोर आला आहे. आलम अन्सारी (वय 20, रा. दिघी. मूळ रा. नालासोपारा, मुंबई) असे मृतदेह आढळलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी जबीन अन्सारी आणि संतोष जाधव या दोघांना अटक करण्यात आली आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक खंडेराव खैरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, अन्सारी मागील काही दिवसांपासून दिघी परिसरात वास्तव्यास होता. तो 6 ऑगस्ट रोजी अचानक बेपत्ता झाला. त्याबाबत दिघी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. पोलिसांची शोधमोहीम सुरु असताना आज (शुक्रवारी) दिघी येथील डोंगरांमध्ये एक कुजलेला मृतदेह आढळला. पोलिसांनी याबाबत अधिक तपास केला असता, हा मृतदेह अन्सारी याचा असल्याचे निष्पन्न झाले. अन्सारीबाबत अधिक माहिती घेत जबीन आणि संतोष या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता त्यांनीच अन्सारी याला मारले असल्याचे कबूल केले. यावरून त्यांना अटक करण्यात आली आहे.

अन्सारी पूर्वी मुंबई मधील नालासोपारा येथे राहायला होता. तिथे राहत असताना अन्सारी आणि आरोपींची किरकोळ कारणावरून भांडणे झाली होती. त्यानंतर अन्सारी दिघी येथे वास्तव्यास आला. पूर्वीच्या भांडणाचा राग मनात धरून जबीन आणि संतोष या दोघांनी अन्सारी याचा चाकूने भोकसून खून केला. खून केल्यानंतर खुनाचा पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने दिघीतील डोंगराळ भागात त्याचा मृतदेह टाकून दिला. मात्र, पोलिसांना हा मृतदेह सापडताच आरोपींना अटक करण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.