Dehu Road Traffic : देहूरोड बाजार पेठेत वाहतूक सुरळीत करण्यासाठी आजपासून नवीन नियम लागू होणार

एमपीसी न्यूज : देहूरोड बाजारपेठेत वाहतूक (Dehu Road Traffic) सुरळीत करण्यासाठी आजपासून (सोमवार 17 ऑक्टोबर) नवीन नियम लागू होणार असल्याची माहिती आरोग्य अधीक्षक (देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड) किरण गोंटे यांनी दिली आहे.
देहूरोड बाजारपेठ ही मावळ तालुक्यातील एक प्रमुख बाजारपेठ आहे. त्यामुळे आसपासच्या गावातील लोक येथे विविध वस्तू खरेदी करण्यासाठी दररोज येत असतात. त्यामुळे बाजारपेठेत सकाळी व संध्याकाळी खूप गर्दी असते.
देहूरोड बाजारपेठेतील दुकानदारांनी रस्त्यावर अतिक्रमण केल्याने तसेच दुकानांच्या समोर लागलेल्या हातगाड्यांमुळे रस्ते अरुंद झाले आहेत. काही हातगाडीवाल्यांनी टपऱ्या बांधल्या आहेत व त्यापुढे त्यांचे साहित्य ठेवतात. यामुळे सुद्धा रस्ते काही भागात अरुंद झाले आहेत. या सर्वांमुळे बाजारपेठेतील रस्त्यांवरती दररोज वाहतूक कोंडी होत असते.
त्यामुळे देहूरोड बाजारपेठेतील दररोजची वाहतूक कोंडी (Dehu Road Traffic) सोडविण्यासाठी देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेण्यात आली होती. या बैठकीत वाहतूक नियमनासाठी नवीन नियमावली तयार करण्यात आलेली आहे. महात्मा गांधी शाळा प्रांगणामध्ये नवीन वाहनतळ करण्यात आले असून त्यामध्ये चार चाकी व दुचाकीसाठी पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे.

हातगाडी धारकांना मंगल कार्यालयाच्या पुढील रिकाम्या जागेत स्थानांतरीत करण्यात येणार आहे. मुख्य बाजारपेठेत व रस्त्याच्या बाजूला हातगाडींना मज्जाव करण्यात येणार आहे. बाजारपेठेतील दुकानांमध्ये पट्टे मारून जागा निश्चित करण्यात आलेली आहे. या पट्ट्यांच्या बाहेर दुकान वाढवण्यास मज्जाव करण्यात आला आहे.
तीन चाकी वाहने (रिक्षा) फक्त ठरलेल्या रिक्षा स्टॅन्डमध्येच उभ्या राहतील. रिक्षा इतरत्र उभ्या राहणार नाहीत, याची दक्षता वाहतूक पोलीस घेतील. जड मालवाहतूकीमुळे बाजारपेठेत सकाळी 11 ते रात्री 8 पर्यंत मज्जाव असेल. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या विरुद्ध दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.
गुंटे म्हणाले, की या नवीन नियमांचे फलक बाजारपेठेत लावण्यात येत आहेत. जेणेकरून लोकांना या नवीन नियमांची माहिती मिळेल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.