Dehuroad : पत्नीसोबत बोलत असल्याच्या रागातून युवकावर प्राणघातक हल्ला

एमपीसी न्यूज – युवक पत्नीसोबत बोलत असल्याचा राग मनात धरून त्याच्यावर दोघांनी प्राणघातक हल्ला केला. कोयत्याने डोक्यात मारून त्याला गंभीर जखमी केले. ही घटना मंगळवारी (दि. 18) दुपारी तीनच्या सुमारास विकासनगर किवळे येथे घडली.

हुसेन यामिन शेख (वय 31, रा. पार्सी चाळ, देहूरोड) असे जखमी युवकाचे नाव आहे. त्याने याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यानुसार महेबूब हनीफ शेख, इरफान शेख (दोघे रा. विकासनगर, देहूरोड) यांच्या विरोधात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हुसेन महेबूब याच्या पत्नीसोबत बोलत होता. याचा राग त्याच्या मनात होता. मंगळवारी दुपारी महेबूब याची पत्नी आणि हुसेन हे दोघेजण विकासनगर येथे बोलत थांबले होते. त्यावेळी महेबूब याने हुसेन याच्यावर प्राणघातक हल्ला केला. त्याने लोखंडी कोयत्याने हुसेनवर हल्ला केला. हुसेन याने हा हल्ला चुकवून कोयत्याचा वार हातावर घेतला. महेबूब आणि इरफान या दोघांनी मिळून कोयत्याने व काठीने मारहाण केली. यामध्ये हुसेन गंभीर जखमी झाला. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.