Dehuroad Crime News : ‘दुसऱ्याशी लग्न केल्यास तुला व तुझ्या आई वडिलांना मारून टाकीन’

अल्पवयीन मुलीला धमकावात केला विनयभंग; आरोपी गजाआड

एमपीसी न्यूज – ‘तू माझ्याशी लग्न कर. तू जर दुसऱ्याशी लग्न केलेस तर तुला व तुझ्या आई वडिलांना मारून टाकीन’, अशी धमकी देत तरुणाने अल्पवयीन मुलीसोबत गैरवर्तन करत तिचा विनयभंग केला. ही घटना बुधवारी (दि. 5) दुपारी देहूरोड येथे घडली.

अर्जुन संजय साठे (वय 27, रा. आदर्शनगर, देहूरोड) याला पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत 16 वर्षीय पीडित मुलीने देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी यांची ओळख आहे. फिर्यादी यांनी आरोपीला 13 एप्रिल रोजी लग्न करण्यास नकार दिला होता. त्या कारणावरून आरोपीने फिर्यादी यांच्या घरासमोर येऊन ‘तू माझ्या नावाची तक्रार दिली आहेस. मला पोलीस स्टेशनमधून फोन आला होता’, असे बोलून त्याने फिर्यादी यांना शिवीगाळ दमदाटी केली.

फिर्यादी यांचा हात पकडून त्यांना घराबाहेर ओढून झाडाची कुंडी फेकून मारली. ‘तू माझ्याशी लग्न कर. तू जर दुसऱ्याशी लग्न केलेस तर तुला व तुझ्या आई वडिलांना मारून टाकीन’, अशी धमकी आरोपीने दिली. तसेच फिर्यादीसोबत आरोपीने गैरवर्तन करत तिचा विनयभंग केला. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.