Dehuroad Crime News : अकराव्या मजल्यावरुन लिफ्टच्या डक्टमध्ये पडून कामगाराचा मृत्यू

दोन बांधकाम कॉन्ट्रॅक्टरच्या विरोधात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – काम येत नसताना क्रेनवर काम करण्यास सांगून त्याला सुरक्षेची साधने पुरवली नाहीत. दरम्यान क्रेनचा अपघात होऊन कामगाराचा अकराव्या मजल्यावरून लिफ्टच्या डक्टमध्ये पडून मृत्यू झाला. याबाबत दोन बांधकाम कॉन्ट्रॅक्टरच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना बुधवारी (दि. 16) पहाटे किवळे येथे घडली.

लखन मच्छिंद्र पवार (वय 28) असे मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे. याबाबत त्यांच्या पत्नी काजल लखन पवार (वय 26, रा. मामुर्डी, ता. हवेली. मूळ रा. अहमदनगर) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

त्यानुसार बांधकाम कॉन्ट्रॅक्टर सुरेश पांडुरंग आडे आणि दयानंद पांडुरंग आडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सुरेश आडे आणि दयानंद गाडे यांची किवळे येथे मंगल विश्व कंस्ट्रक्शन साइट सुरू आहे. या बांधकाम साइटवर मयत कामगार लखन पवार कामास होता. बुधवारी पहाटे दोन वाजताच्या सुमारास क्रेनच्या सहाय्याने सिमेंट चौकटी तळमजल्यावरून अकराव्या मजल्यावर घेण्याचे काम सुरू होते. क्रेनवरील काम येत नसताना आरोपींनी कामगार लखन पवार याला कोणतीही सुरक्षेची साधने न पुरवता क्रेनवर कामाला लावले.

दरम्यान, तळमजल्यावरून सिमेंट चौकटी अकराव्या मजल्यावर घेत असताना क्रेन जागेवरून उखडले. त्यात क्रेनचा लखन पवार याला मागून धक्का बसला. त्यामुळे त्याचा अकराव्या मजल्यावरून तोल जाऊन तो लिफ्टच्या डक्टमध्ये तळमजल्यावर पडला. त्याच्या अंगावर क्रेन पडले. यामध्ये लखन पवार याच्या डोक्यात आणि शरीरावर ठिकाणी गंभीर जखमा झाल्या. त्यातच त्याचा मृत्यू झाला.

याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.