Pune News : आरोग्य निरीक्षकाला न जुमानता महापालिकेच्या मैदानावर टाकला चार ट्रक राडारोडा, चालकांविरोधांत गुन्हा

एमपीसी न्यूज – पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य निरीक्षकाला न जुमानता महापालिकेच्या मैदानावर तब्बल चार ट्रक राडारोडा टाकण्यात आला. कोंढवा येथील ट्राफिक ऑफिसच्या पाठीमागे असलेल्या महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज क्रिडांगण येथे सोमवारी (दि.13) दुपारी 12.30 वा सुमारास हा प्रकार घडला. याप्रकरणी चार ट्रक चालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य निरीक्षक मारूती हणमगर (वय 43, रा. दत्तवाडी, पुणे) यांनी याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, छत्रपती शिवाजी महाराज क्रिडांगण, कोंढवा येथे काही जण राडारोडा असलेला ट्रक मैदानावर खाली करत असल्याची माहिती फिर्यादी आरोग्य निरीक्षक मारूती हणमगर यांना मिळाली. फिर्यादी यांनी चालकांना राडारोडा टाकण्यास विरोध केला मात्र, चालकांनी मैदानावर राडारोडा टाकून तिथून पळ काढला, असे फिर्यादीत म्हटले आहे. कोंढवा पोलीस याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.