Pimpri News : एमआयडीसीमधील समस्यांनी उद्योजक हैराण – पार्थ पवार

एमपीसी न्यूज – आगामी महानगरपालिका निवडणूकीच्या तोंडावर राष्ट्रवादीचे नेते पार्थ पवार ट्वीटरवर चांगलेच सक्रिय झाले आहेत. मागील काही दिवसांपासून पिंपरी – चिंचवड शहरातील विविध समस्यांवर ते निरंतर भाष्य करत आहेत. आज (मंगळवारी) पार्थ पवार यांनी एमआयडीसीमधील उद्योजक विविध समस्यामुळे हैराण असल्याचे आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे.

पार्थ पवार यांनी आज सकाळी मराठा चेंबर ऑफ कॉमर्स यांना आपले ट्वीट टॅग करत पालिका प्रशासनावर देखील ताशेरे ओढले आहेत. ‘एमआयडीसीमधील समस्यांनी उद्योजक हैराण झाले आहेत. मूलभूत प्रश्न व चोऱ्या, अपघात, कचरा, धमकावणे अशा प्रकारांमुळे काम करणे त्यांना जिकरीचे झाले असून, पिंपरी चिंचवड शहराची उद्योगनगरी ही ओळख पुसत जाण्यास ही अनास्था कारणीभूत आहे. प्रशासनाने त्वरित हे प्रश्न मार्गी लावावेत’. असे ट्वीट पार्थ पवार यांनी केले आहे.

पार्थ पवार यांना मावळ मदारसंघातून लोकसभा निवडणूकीत पराभव पत्करावा लागला होता. सध्या महापालिका निवडूकीच्या तोंडावर पार्थ पवार सातत्याने विविध विषयावर ट्वीटरच्या माध्यमातून आपली मते व्यक्त करत आहेत, असे असले तरी पार्थ पवार शहरात किती सक्रिय असतात? कोणत्या समस्यांचा आढावा त्यांनी स्वत: घेतला आहे? कोणती मागणी त्यांनी आजपर्यंत लावून धरली आहे? अशी दबक्या आवाजात चर्चा शहरात सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.