Chakan Crime News : फायनान्स कंपनीकडून आल्याचे सांगत मागितली दीड लाखांची खंडणी

एमपीसी न्यूज – आम्ही फायनान्सचे लोक आहोत. बसचे तीन हप्ते थकले आहेत, असे म्हणून दोघांनी बस चालकाला शिवीगाळ करून ती कडाचीवाडी येथे एका पार्किंग मध्ये पार्क करण्यास सांगितली. बस सोडण्यासाठी एक लाख 62 हजार रुपयांची खंडणी मागितली. ही घटना रविवारी (दि. 12) सकाळी साडेआठ वाजता नाशिक-पुणे रोडवर तळेगाव चौकात चाकण येथे घडली.

अविनाश नामदेव तापकीर (रा. वङमुखवाडी, च-होली) आणि त्याचा एक मित्र यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी 54 वर्षीय महिलेने चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या मालकीची बस मुश्ताक हा चालवतो. रविवारी सकाळी मुश्ताक याने बस आणली असताना आरोपी एका मोपेड दुचाकीवरून आले. ‘आम्ही फायनान्सचे लोक आहोत. तुमच्या बसचे तीन हप्ते ठकले आहेत’ असे म्हणून बस चालकाला शिवीगाळ दमदाटी केली. त्यानंतर बसमधील प्रवाशांना दमदाटीने खाली उतरवले. बळजबरीने धमकावून बस ताब्यात घेऊन ती प्रगती पार्किंग काडाचीवाडी येथे लावली. बस सोडायची असेल तर एक लाख 62 हजार रुपये द्यावे लागतील, असे म्हणून खंडणी मागितली. चाकण पोलीस याप्रकरणी तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.