Dighi : लग्नानंतर एकाच महिन्यात पत्नीने मागितला घटस्फोट; पतीचा पत्नीवर खुनी हल्ला

एमपीसी न्यूज – लग्नापूर्वी पतीचे प्रेम प्रकरण असल्याचे पत्नीला माहिती झाले. या कारणावरून लग्नानंतर एकाच महिन्याने नवविवाहितेने पतीकडे घटस्फोटाची मागणी केली. या कारणावरून चिढलेल्या पतीने पत्नीला एका लॉजवर बोलावून तिच्यावर चाकूने वार करत खुनी हल्ला केला. ही घटना शनिवारी (दि. 22) दुपारी साडेबाराच्या सुमारास दिघी येथे घडली.

स्नेहा विशाल डोंगरे (वय 26, रा. मोशी) असे जखमी झालेल्या पत्नीचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, पती विशाल अंकुश डोंगरे (वय 30, रा. भोसरी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्नेहा आणि विशाल यांचा एक महिन्यापूर्वी विवाह झाला होता. लग्नापूर्वी विशालचे प्रेमप्रकरण होते. याची माहिती स्नेहाला समजली. त्यामुळे विशाल आणि स्नेहा दोघेही विभक्त राहू लागले. तसेच स्नेहाने विशालकडे घटस्फोटाची मागणी केली. घटस्फोटाबाबत बोलण्यासाठी विशालने स्नेहा यांना शनिवारी सकाळी मॅगझीन चौक, दिघी येथील एका लॉजवर बोलावले.

लॉजवर दोघांचे विशालच्या पहिल्या प्रेम प्रकरणाबाबत बोलणे सुरु झाले. विशाल याने स्नेहा यांच्यावर चाकूने हल्ला केला. दोन्ही हात आणि पोटावर वार करत स्नेहा यांना गंभीर जखमी केले. स्नेहा यांना दिघी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांनी विशालला अटक केली आहे. दिघी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.