Chakan : देशाच्या जवानांवर अविश्वास दाखविणा-यांना लाज वाटत नाही काय ; उद्धव ठाकरे यांचा हल्ला 

चाकणला शिवसेनेची सभा 

एमपीसी न्यूज – महायुतीचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी आहेत. मात्र विरोधकांचा पंतप्रधान पदाचा उमेदवार कोण हेच निश्चित नाही. आम्हाला मते द्या मग पुढे बघू असे सांगत आहेत. सर्जिकल स्ट्राईकवर संशय व्यक्त करणारे कोण आहेत असा सवाल करत ज्यांना आपल्या देशाच्या सैनिकावर विश्वास नाही ते जनतेकडे मतांची भिक मागत असून देशाच्या जवानांवर अविश्वास दाखविणार्यांना लाज वाटत नाही का ?  अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरेंनी गुरुवारी (दि.२५) चाकण ( ता. खेड, जि. पुणे) येथील जाहीर सभेत विरोधकांवर टीकास्त्र सोडले.  

शिरूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ झालेल्या जाहीर सभेत ठाकरे बोलत होते.

ठाकरे पुढे म्हणाले की, बैलगाडा शर्यतींचा विषय सोडविण्यासाठी पुढील काळात स्वतः लक्ष घालून हा विषय सोडविला जाईल, असे आश्वासनही यावेळी ठाकरे यांनी दिले. खासदार तुमच्या सोबत राहणारा हवा की नाटकात काम करणारा हवा, असा प्रश्न उपस्थित करून जसे आम्हाला मालिका बघून शिवराय आणि संभाजी महाराज समजले तसे त्या मालिकांमध्ये काम करणा-यांनी आपलेच काम वारंवार बघून निष्ठा कशाला म्हणतात ते शिकून घ्यावे, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे उमेदवार अभिनेते अमोल कोल्हे यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले.

शिवाजीराव आढळराव यांनी या भागात केलेल्या विकास कामावर जनतेचा विश्वास असल्याने ते चौकारच काय षटकार मारतील, असा विश्वास यावेळी व्यक्त केला. या सभेला जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट, उमेदवार खा. शिवाजीराव आढळराव,  म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत, सेनेच्या प्रवक्त्या नीलम गोऱ्हे, आमदार सुरेश गोरे, महेश लांडगे, शरद सोनवणे आदींसह कार्यकर्ते आणि हजारोंच्या संखेने शिवसैनिक उपस्थित होते. या सभेला झालेली तोबा गर्दी पाहून विरोधकांच्या पायाखालची जमीन सरकल्याची चर्चा सभास्थळी उपस्थित असलेल्या शिवसैनिकांमध्ये होती.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.