Hinjawadi : ऑनलाईन पेमेंटच्या बहाण्याने दुकानदाराला 70 हजारांचा गंडा

एमपीसी न्यूज – टायर खरेदी करायचे आहेत. त्याचे पैसे अगोदर तुमच्या खात्यावर पाठवतो. असे म्हणून ऑनलाईन पेमेंट करण्याच्या बहाण्याने एकाने दुकानदाराला 69 हजार 600 रुपयांना ऑनलाईन गंडा घातला. हा प्रकार टायर कॉटेज दुकानात बावधन येथे घडला.

सुरज रवींद्र सपकाळ (वय 23, रा. एनडीए रोड, बावधन) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार 8690406958 मोबाईल धारकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरज यांचे एनडीए रोड, बावधन येथे टायर कॉटेज हे दुकान आहे. 29 जानेवारी रोजी 8690406958 मोबाईल धारकाने सुरज यांना फोन केला. त्याने ‘चार टायर खरेदी करायचे आहेत. त्याचे पैसे ऑनलाईन पाठवतो. चालक कार घेऊन येईल. तुम्ही टायर बसवून द्या’ असा बहाणा करून गुगल पे नंबर घेतला. सुरज यांच्या गुगल पे नंबरवर मेसेज करून त्यांना मेसेज मधील लिंकवर क्लिक केल्यास पैसे मिळतील, असे सांगितले.

सुरज यांना आलेल्या मेसेजवर त्यांनी क्लिक केले. परंतु पैसे आले नाहीत. सुरज यांनी मोबाईल धारकाशी संपर्क साधला. त्याने पुन्हा मेसेज येईल, त्यावर पुन्हा क्लिक करा, असे सांगितले. त्यानुसार सुरज यांनी चारवेळा क्लिक केले. चार वेळेला मोबाईल धारकाने सुरज यांच्या खात्यातून 69 हजार 600 रुपये काढून त्यांची आर्थिक फसवणूक केली. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.