Election Commission : राज्यात एकूण 9 कोटी दोन लाख 85 हजार 801 मतदार, अंतिम मतदार यादी प्रसिद्ध

एमपीसी न्यूज : भारत निवडणूक आयोगामार्फत दि. 1 जानेवारी 2023 या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष (Election Commission) संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम घोषित करण्यात आला होता. यानुसार राज्यात एकूण 9 कोटी दोन लाख 85 हजार 801 मतदारांची नोंदणी झाली असल्याची माहिती अपर मुख्य सचिव तथा मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

देशपांडे यांनी याबाबत सविस्तर माहिती देताना सांगितले की, 04 ऑगस्ट, 2022 ते 07 नोव्हेंबर, 2022 या कालावधीत पूर्व- पुनरीक्षण उपक्रम राबविण्यात आले होते. या कालावधीमध्ये मतदान केंद्राचे सुसुत्रीकरण व प्रमाणिकरण, दुबार नोंदणीच्या त्रुटी दूर करणे इ. सुधारणा करून दि. 09 नोव्हेंबर,2022 रोजी एकत्रित प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली होती. विशेष संक्षिप्त पुनरीक्षणाच्या कालावधीत युवा मतदारांनी तसेच दिव्यांग, महिला, देह व्यवसाय करणाऱ्या महिला, तृतीयपंथीय व्यक्ती व विमुक्त भटक्या जमातीतील पात्र व्यक्तींनी मोठ्या प्रमाणात नोंदणी करावी याकरिता विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले व त्याला चांगला प्रतिसाद मिळाला.

Pimpri News : मोशी टोल नाका बंद करा अन्यथा फोडण्यात येईल – सामाजिक कार्यकर्ते सचिन काळभोर 

भारत निवडणूक आयोगाने राज्यातील विशेषतः असंरक्षित आदिवासी गट (PVTG) प्रवर्गातील पात्र व्यक्तींची 100 टक्के नोंदणी करण्याबाबत निदेश दिले होते. त्याप्रमाणे 100 टक्के नोंदणी केल्याबाबत संबंधित जिल्ह्यांनी प्रमाणित केले आहे. एकत्रित प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केल्यानंतर दि. 09 नोव्हेंबर, 2022 ते 8 डिसेंबर, 2022 या कालावधीत नागरिकांकडून दावे व हरकती स्वीकारुन दि. 26 डिसेंबर, 2022 पर्यंत सर्व दावे व हरकती निकालात काढण्यात आलेल्या आहेत. त्यानंतर आज दि. 05 जानेवारी, 2023 रोजी अंतिम मतदार यादी संपूर्ण राज्यभर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

या अंतिम मतदार यादीनुसार राज्यात पुरूष मतदारांची संख्या 4 कोटी 71 लाख 35 हजार 999, महिला मतदारांची संख्या 4 कोटी 31 लाख 45 हजार 067 तर तृतीयपंथीय मतदारांची संख्या 4 हजार 735 असून एकूण मतदारांची संख्या 9 कोटी 2 लाख 85 हजार 801 असल्याची माहिती श्री.देशपांडे यांनी यावेळी दिली. या यादीत नाव आणि इतर माहितीत दुरूस्ती केलेले पुरूष मतदार 1 लाख 52 हजार 254, महिला मतदार 1 लाख 6 हजार 287 तर तृतीयपंथीय 90 असे एकूण 2 लाख 58 हजार 631 मतदार आहेत.(Election Commission) 9 नोव्हेंबर 2022 च्या नोंदणीनुसार राज्यातील मतदारांची एकूण संख्या 8 कोटी 98 लाख 42 हजार 301 इतकी होती. तर, 5 जानेवारी 2023 नुसार त्यात वाढ होऊन ती 9 कोटी 2 लाख 85 हजार 801 एवढी झाली आहे. एकूण मतदारांपैकी दिव्यांग मतदारांची संख्या 6 लाख 77 हजार 483 इतकी असून, गतवर्षीच्या तुलनेत यात 15 हजार 332 ने वाढ झाली असल्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.