Talegaon : मावळातील महिलांच्या सक्षमीकरणावर भर देणार – सुनील शेळके

एमपीसी न्यूज – प्रत्येक घरातील महिला आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी झाली तर संपूर्ण कुटुंबाचा विकास होतो. त्यामुळे मावळातील महिलांच्या सक्षमीकरणावर आपण भर देणार आहोत, अशी ग्वाही मावळातील भाजपचे युवा नेते व तळेगाव दाभाडेचे माजी उपनगराध्यक्ष सुनील शेळके यांनी आज दिली. 

सुनील शेळके यांच्या गावभेट दौर्‍याची सुरुवात कान्हे गावापासून झाली. त्यावेळी ते बोलत होते. कान्हे गावात शेळके यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. त्यात महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद होता. सर्व महिला फेटे बांधून स्वागतासाठी हजर होत्या. त्यावेळी भाजप महिला आघाडीच्या तालुकाध्यक्ष मंदाताई सातकर, सरपंच पूनम सातकर(सरपंच), विलास मालपोटे, अनिल मालपोटे, बबनराव मालपोटे, बंडोबा सातकर, दिनकर सातकर, रामभाऊ कशाळे, बबनदादा हेमाडे, राघु डोळस, देवकु कशाळे, अशोक वाडेकर, आप्पाजी करवंदे, भरत लष्करे, संदीप लष्करे, शुभांगीताई दरेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

शेळके म्हणाले की, कुटुंबाप्रमाणेच समाजातही महिलांचे स्थान महत्त्वाचे आहे. महिलांना मानसन्मानाची वागणूक मिळते, तोच समाज खऱ्या अर्थाने प्रगती करतो. मुलींना दर्जेदार शालेय शिक्षण मिळणे, हा त्यांचा हक्क आहे. त्याच बरोबर त्यांना रोजगार मिळवून देईल, असे व्यावसायिक प्रशिक्षण देणे, ही देखील काळाची गरज आहे. महिला या आपापल्या परीने कुटुंबाला हातभार लावत असतात. त्यांचे सक्षमीकरण झाल्यास त्या आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होतील. पर्यायाने त्यांच्या कुटुंबाचाही आर्थिक विकास होईल. त्यामुळे महिलांलाठी व्यावसायिक प्रशिक्षण वर्ग, महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तूंसाठी बाजारपेठ विकसित करणे, महिलांसाठी असलेल्या शासनाच्या विविध योजना त्यांच्यापर्यंत पोहचविणे, अशा विविध मार्गांनी महिला सक्षमीकरणाला गती देण्यास आपले प्राधान्य राहील.

शेळके यांनी आज आंदरमावळातील कान्हे, फळणे, माऊ, मोरमारेवाडी, गबालेवाडी, लष्करवाडी व वडेश्वर या गावांना भेटी देऊन तेथील नागरिकांशी संवाद साधला. प्रत्येक गावात ढोल-ताशांच्या दणदणाटात त्यांचे उत्स्फूर्तपणे स्वागत करण्यात आले.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.