Express Way : पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर मागील वर्षांत 126 जणांनी गमावला जीव

एमपीसी न्यूज – पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर सन 2022च्या तुलनेत सन 2023 या वर्षांत( Express Way ) अपघातांच्या संख्येत घट झालेली आहे. महामार्ग पोलिसांकडून अपघात कमी करण्यासाठी राबवल्या जात असलेल्या मोहिमांमुळे हे प्रमाण कमी झाले असल्याचे म्हटले जात आहे. जानेवारी ते डिसेंबर 2023 या कालावधीत द्रुतगती मार्गावर झालेल्या 271 अपघातांमध्ये 126 जणांचा मृत्यू झाला आहे.

पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर जानेवारी ते डिसेंबर 2022 या कालावधीत 329 अपघात झाले. त्यातील 152 प्राणांतिक अपघात होते. यामध्ये 186 जणांचा मृत्यू झाला. तर जानेवारी ते डिसेंबर 2023 या कालावधीत 271 अपघातांची नोंद झाली असून त्यातील 103 अपघात हे प्राणांतिक होते. त्यामध्ये 126 जणांचा मृत्यू झाला आहे. विविध उपाययोजना केल्या जात असल्याने प्राणांतिक अपघातांच्या संख्येत 32.23 टक्के घट झाल्याचे दिसून येत आहे.

Chakan : आर्थिक वादातून तरुणाची हत्या

पुणे-मुंबई द्रुतगती मार्ग दोन मोठ्या शहरांना जोडणारा महत्वाचा मार्ग आहे. या मार्गावरून प्रवासी वाहतुकीसह मोठ्या प्रमाणात मालवाहतूक देखील होत असते. अधिक वेळ वाहन चालवल्याने चालकाला झोप लागणे, अचानक लेन बदलणे, वाहनावरील नियंत्रण सुटणे, वाहन बंद पडणे अथवा खराब होणे, मर्यादित वेगापेक्षा अधिक वेगाने वाहन चालवणे, वाहन चालवताना मोबाईलवर बोलणे, सीटबेल्ट न लावणे अशा अनेक कारणांमुळे अपघात घडत असतात.

महामार्ग पोलीस, आरटीओ विभाग यांच्याकडून द्रुतगती मार्गावर जनजागृती अभियान, दंडात्मक कारवायांच्या मोहिमा राबविले जातात. मागील वर्षभरात नियमभंग करणाऱ्या 65 हजार वाहन चालकांवर द्रुतगती मार्गावर कारवाई करण्यात आली आहे. यामुळे नियमभंग करण्याचे प्रमाण कमी झाले आहे. त्याचाच परिणाम अपघातांच्या संख्येत झाला आहे. सन 2022च्या तुलनेत सन 2023 मध्ये अपघातांची संख्या 16.62 टक्के, प्राणांतिक अपघातांची संख्या 32.23 टक्के, मृतांची संख्या 32.25 टक्के कमी ( Express Way ) झाली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.