Chinchwad : महिलांवर अत्याचार करणा-या आरोपींची नग्न धिंड काढा – कोमल काळभोर

एमपीसी न्यूज – मागील काही दिवसांपासून महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये कमालीची वाढ झाली आहे. काही घटनांमध्ये चिमुरड्या मुलींवर बलात्कार करून त्यांची हत्या करण्यात आली आहे. या गुन्हेगारांवर जरब बसवण्यासाठी महिलांवर अत्याचार करणा-या आरोपींची नग्न धिंड काढण्यात यावी, अशी मागणी पिंपरी-चिंचवड शहर भाजपच्या सोशल मीडिया प्रमुख कोमल काळभोर यांनी पोलीस आयुक्तांकडे केली.

कोमल काळभोर यांनी पोलीस आयुक्त आर के पद्मनाभन यांना याबाबत लेखी निवेदन दिले आहे. निवेदनात म्हटले आहे की, मागील काही महिन्यात पिंपरी-चिंचवड शहरात महिला आणि लहान मुलींवर होणाऱ्या लैंगिक अत्याचाराच्या घटनांमध्ये कमालीची वाढ झाली आहे. भोसरी, पिंपळे सौदागर, नेहरूनगर येथील घटनांमध्ये चिमुरडींवर बलात्कार करून त्यांची हत्या करण्यात आली. या सर्व घटना अतिशय गंभीर आणि संतापजनक असून या घटनांमुळे शहरातील महिला, तरुणी आणि चिमुरड्यांच्या सुरक्षिततेवर तसेच पोलीस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

शहरातील महिला वर्गामध्ये भीतीचे व असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. नागरिकांचा पोलीस प्रशासनावरील विश्वास अजूनही दृढ असून या घटनांना आळा घालण्यासाठी कडक धोरण अवलंबिणे आवश्यक आहे. या घटनेतील नराधम आरोपींची संपूर्ण शहरातून नग्न धिंड काढण्यात यावी. तसेच त्यांना फाशीची शिक्षा व्हावी, त्यादृष्टीने प्रयत्न पोलिसांकडून करण्यात यावेत. यामुळे आरोपींवर जरब बसण्यास मदत होईल, असेही निवेदनात म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.