Pune Crime News : स्वतःच्याच घरात चोरीचा बनाव करणे पडले महागात;समर्थ पोलिसांनी ठोकल्या बेड्या

एमपीसी न्यूज – कर्जबाजारीपणातून बाहेर पडणे कठीण झाल्याने स्वतःच्या घरात चोरीचा (Pune Crime News) बनाव करणाऱ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. हा सर्व प्रकार अवघ्या एका दिवसातच समर्थ पोलिसांनी उघडकीस आणला.

 

 

शांतीलाल कुंदनमल बोहरा (वय.53 रा. अमर सेंटर, पुणे) असे अटक आरोपीचे नाव आहे. बोहरा यानेच शनिवारी (दि.23) सकाळी पावणे अकरा वाजता चोरी झाल्याचे पोलिसांना सांगितले होते. मात्र अवघ्या एका दिवासात त्याचे पितळ उघडे पडले.

 

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बोहरा याने पोलिसांना सांगितले की, शनिवारी त्याची पत्नी घरी एकटीच असताना दोन अनोळखी इसम घरात घुसले व त्यांनी चाकुचा धाक दाखवून, हाताने व चपलाने मारून घरातील 39.5 तोळे सोन्याचे दागिने व  रोख दिड लाख रुपयांची रक्कम चोरून नेली. भरादिवसा घरात एवढी मोठी चोरी झाल्याने पोलीसांनी घटनेचे गांभीर्य पाहून दोन पथके तपासासाठी पाठवली. यावेळी एक पथक तांत्रीक शोध घेत होते. तर दुसरे पथक आरोपीचा शोध घेत होते.

 

तपासा दरम्यान घराच्यांचे जबाब घेतले असता त्यांचे हावभाव व जबाब यांच्यात साम्य दिसत नव्हते. पोलिसांना संशय आल्याने त्यांची तपासाची चक्रे उलटी फिरवत घरच्यांकडेच कसून चौकशी करण्यास सुरुवात केली. यावेळी बोहरा याचे पितळ उघडे पडले. बोहरा याने बाहेरून 42 लाख रुपयांचे कर्ज घेतले आहे. ते फेडणे कठीण जात असल्याने घरात चोरी झाल्याचे भासवून कर्जदारांकडून सहानुभूती व सवलत मिळविण्यासाठी हा बनाव केल्याचे त्याने मान्य केले. तसेच चोरी गेलेला म्हणून लपवून ठेवलेला ऐवजही पोलिसांसमोर सादर केला.यावरून पोलिसांनी पोलिसांची फसवणूक केल्या प्रकर्णी गुन्हा दाखल केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.