Famous Pen’s Ganesh Idols: यंदा छोट्या गणेशमूर्तींनाच जास्त मागणी

यंदाच्या गणेशोत्सवात जरी कोरोनाचे विघ्न असले तरी तो विघ्नहर्ता त्याच्या आगमनाने हे सगळे विघ्न दूर करेल असा आशावाद त्याच्या प्रत्येक भक्ताच्या मनी आहे.

एमपीसी न्यूज (स्मिता जोशी)- विघ्नहर्त्या गणरायाच्या आगमनाला आता काही तास उरले आहेत. यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साधेपणाने गणेशोत्सव करण्याचे सर्वजण आवाहन करत आहेत. सार्वजनिक गणेशोत्सव टाळलेलेच बरे असे देखील म्हटले जात आहे. पोलिसांनी आणि शासनाने या संबंधीचे नियम जारी केले आहेत. याआधी कधीही आलेले नाही असे हे कोरोनानामक विषाणूचे संकट मानवजातीवर आलेले आहे. सार्वजनिक देखाव्यांची अनेक वर्षांची परंपरा यावेळी शिथिल केली जात आहे.

या परिस्थितीत गणपतीच्या मूर्ती जेथे तयार होतात त्या पेणच्या गणेश व्यवसायाबद्दल जाणून घेऊन सध्या तिथे काय परिस्थिती आहे, याचा वेध घेतला. पेणला गणपती मूर्ती जेथे तयार केल्या जातात त्याला कारखाना असे म्हणतात.

पेण येथे गणेश मूर्ती तयार करण्याची सुमारे शंभर वर्षांची परंपरा आहे. आजही पेणचे प्रसिद्ध काय असं विचारले तर गणपती असेच उत्तर येते. पेण येथे गेली सुमारे पंचेचाळीस ते पन्नास वर्षांपासून या क्षेत्रात असलेले राजेंद्र सावंत यांच्याशी या विषयी चर्चा केली.

श्रीकृपा कला केंद्र या नावाचा गणपतीचा कारखाना ते पेण येथे चालवतात. हा त्यांचा पिढीजात कारखाना आहे. आधी त्यांचे काका हा व्यवसाय सांभाळत असत. मागील सुमारे पंचवीस वर्षांपासून राजेंद्र हा कारखाना सांभाळतात. व्यवसायाने बांधकाम व्यावसायिक असलेले राजेंद्र इंजिनिअर आहेत. पण हा पिढीजात व्यवसाय असल्याने ते आनंदाने गणपती तयार करण्याचे काम करतात.

यंदा कोरोनामुळे गणपती तयार करण्याच्या कामाला सुरुवातच उशिरा झाली. त्यात लॉकडाऊन असल्याने कारागीर येऊ शकत नव्हते. कच्चा माल मिळण्यास थोडा उशीर होत होता. त्यामुळे नेहमीच्या लोकांना गणपतीच्या मूर्ती देता येतील की नाही याची भीती होती. पण गणपती बाप्पा विघ्नहर्ताच आहे. हळूहळू ही सर्व संकटे कमी होऊन गणपतीच्या मूर्ती तयार झाल्या.

मात्र यंदा लोकांचा कल फक्त शाडूमातीच्या मूर्ती घेण्याकडेच आहे हे राजेंद्र यांनी विशेषत्वाने नमूद केले. तसेच यंदा मोठ्यांपेक्षा छोट्या गणेशमूर्तींना जास्त मागणी आहे, असेही ते म्हणाले. कारण यंदा मोठ्या प्रमाणावर गणेशमूर्तींचे घरीच विसर्जन केले जाणार आहे.

यंदा ऑर्डर कमी घेतल्या पण ज्या घेतल्या त्यांना घरपोच मूर्ती पोहोचवण्याची व्यवस्था केली. राजेंद्र यांच्याकडील गणेशमूर्ती नागपूर, मुंबई, पुणे, अहमदाबाद, सूरत, बडोदा, नाशिक येथे पाठवल्या जातात आणि ज्या ठिकाणी मूर्ती जातात ते वर्षानुवर्षांचे ठरलेले लोक आहेत.

गणपतीचे बुकिंग साधरणपणे फोनवरचे केले जाते. बुकिंग म्हणण्यापेक्षा त्याला आठवण म्हणणेच योग्य ठरेल. कारण राजेंद्र गणपतीची मूर्ती आठवणीने पाठवणारच याची त्यांच्या सगळ्या गि-हाईकांना खात्रीच असते.

साधारणपणे गणपतीच्या मूर्तींचे प्रकार ठरलेले असतात. ते परंपरेने चालत आलेले आहेत. त्यात कोणीही फारसा बदल करत नाही. लोडाला टेकलेला, उंदरावर बसलेला, चौरंगावर विराजमान झालेला अशा प्रकारच्या गणेशमूर्ती असतात.

यंदाच्या गणेशोत्सवात जरी कोरोनाचे विघ्न असले तरी तो विघ्नहर्ता त्याच्या आगमनाने हे सगळे विघ्न दूर करेल असा आशावाद त्याच्या प्रत्येक भक्ताच्या मनी आहे. भक्तांच्या आयुष्यातील सर्व दुख, दैन्य, विघ्न दूर होऊन सर्वांचे भले होऊ दे हीच त्या मंगलमूर्तीच्या चरणी प्रार्थना.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.