Pimpri : वराह पालन करणा-यांवर गुन्हे दाखल करा; आयुक्तांचा आदेश

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराच्या अनेक भागात डुकरांचा सुळसुळाट आहे. याबाबत अनेक तक्रारी प्रशासनाकडे आल्या देखील आहेत. स्थायी समिती सभेत सदस्यांनी हा विषय उचलून धरत, तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली. याची दखल घेत महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी शहरात वराह पालन करणा-या तीन व्यवसायिकांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

थेरगाव परिसरात डुकरांचा सुळसुळाट सुरु आहे. त्यामुळे नागरिक त्रस्त झाले असून पालिकेकडून डुक्करांचा बंदोबस्त केला जात नसल्याच्या आरोप करत शिवसेनेचे नगरसेवक सचिन भोसले यांनी तीन सप्टेंबर रोजी पालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिका-यांच्या पालिका मुख्यालयातील कार्यालयात डुक्कर सोडले होते. त्यानंतर त्याच्या दुस-याचदिवशी पालिकेने वराहपालन करणा-या मालकांनी आपली डुकरे मनपा हद्दीच्या बाहेर सात दिवसांच्या आत त्वरित हलवावीत अन्यथा संबंधित मालकांवर कायदेशीर कारवाई करून फौजदारी गुन्हे दाखल केले जातील असा इशारा दिला होता.

त्याचप्रमाणे महापालिकेच्या स्वछताविषयक तरतुदीनुसार या डुकरांना अटकाव करून ती नष्ट करण्यात येतील. तसेच डुकरांच्या प्रेतांची विल्हेवाट महापालिकेमार्फत लावली जाईल. डुकराबद्दलच्या नुकसानभरपाई बाबत दावा दाखल करता येणार नाही असेही स्पष्ट केले होते. तथापि, पुढेच काही कारवाई झाली नाही. त्यामुळे आज (मंगळवारी) झालेल्या स्थायी समितीच्या सभेत डुक्करांबाबत जोरदार चर्चा झाली. नगरसेवकांनी आक्रमक भुमिका घेत डुक्करांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली होती. त्यानंतर आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी वराहपालन करणा-या तिघांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची निर्देश दिले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.