Fire Fighter Bikes : आगीच्या घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी अग्निशामक मोटार सायकलद्वारे गस्त

एमपीसी न्यूज – शहरातील आगीच्या घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी अग्निशामक मोटार सायकलद्वारे (Fire Fighter Bikes) पेट्रोलिंगद्वारे लक्ष ठेवले जात आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही कारणास्तव आग लागून दुर्घटना घडू नये, यासाठी महापालिकेच्या वतीने उपाययोजना म्हणून खबरदारी घेतली जात असून 24×7 फायर फायटर वाहनांचे पथक सज्ज ठेवण्यात आले असल्याचे मुख्य अग्निशमन  अधिकारी किरण गावडे यांनी सांगितले.  

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी शहरातील काही भागात सायंकाळी 7 ते रात्री साडे दहाच्या सुमारास फटक्यांमुळे नऊ ठिकाणी लागलेल्या मध्यम स्वरूपाच्या आगींवर या वाहनांद्वारे तात्काळ नियंत्रण मिळवण्यात आल्याची माहितीही गावडे यांनी यावेळी दिली.

 दीपावली हा सण आनंदी वातावरणात उत्साहाने साजरा होत आहे. दिवाळीनिमित्त शहरात विविध ठिकाणी तसेच घरोघरी विद्युत रोषणाई करण्यात येते, तसेच प्रकाशदिवे लावले जातात. शिवाय फटाक्यांची आतषबाजी देखील करण्यात येत आहे. हा उत्सव साजरा करताना आग लागून कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी महापालिकेच्या वतीने अग्निशामक विभागाच्या वतीने सूक्ष्म नियोजन करण्यात आले आले.

आपत्ती व्यवस्थापन करताना शहरातील अरुंद रस्ते, वर्दळीच्या ठिकाणी लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी तसेच आपत्कालीन स्थितीत मदत पुरवण्यासाठी पथके सज्ज ठेवण्यात आले असून त्यादृष्टीने नियोजन  करण्यात आले आहे.

चिखली पोलीस स्टेशन आणि पिंपरी येथील इंदिरा गांधी पुलावर स्वतंत्र अग्निशामक बंब तैनात ठेवण्यात आला आहे. अग्निशामक मोटार सायकलद्वारे (Fire Fighter Bikes) शहरातील विविध भागात गस्त घालण्यात येत आहे. त्यामुळे आग लागलेल्या वर्दळीच्या ठिकाणी या वाहनाद्वारे वेळेत आणि सहज पोहोचता येणे शक्य होत आहे.

 महापालिकेच्या वतीने अग्निशमन विभागाच्या ताफ्यामध्ये गत जून महिन्यामध्ये सहा अग्निशामक मोटार सायकलचा (Fire Fighter Bikes) समावेश करण्यात आला आहे. या वाहनांचा उपयोग पिंपरी चिंचवड कार्यक्षेत्रातील अरुंद रस्ते, गल्लीमधील आगी, मार्केट परिसर अशा ठिकाणी  आपत्कालीन परिस्थितीत तातडीने सेवा देऊन परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी करण्यात येत आहे.

Pune Fire News : लक्ष्मीपूजनाच्या रात्री शहरात चार तासांत 17 ठिकाणी आगीच्या घटना

 महापालिकेच्या वतीने शहरात आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास त्याठिकाणी तातडीने सेवा व मदत पोहचवण्यास कोणताही अडथळा निर्माण होऊ नये यासाठी तसेच  मोठ्या अग्निशामक गाड्यांना घटनास्थळी तातडीने पोहचवण्यासाठी रस्त्यावरील वाहतूक बाजूला करण्याकरिता अग्निशामक मोटार सायकलचा वापर करण्यात येत आहे.

घटनास्थळी 40 लिटर पाणी वाहून नेण्याची क्षमता असलेल्या या मोटार सायकल  सोबत प्रथमोपचार पेटी, अग्निशामक वायू, ध्वनिक्षेपक यंत्र असे साहित्य देखील आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.