Pimpri News : शहरात गोवरचे 5 रुग्ण, कुदळवाडीत गोवरचा उद्रेक

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रामध्ये आकुर्डी रुग्णालय अंतर्गत कुदळवाडी या क्षेत्रातील गोवर आजाराचे 7 पैकी 5 संशयीत रुग्णांचे रक्त तपासणी (Pimpri News) व घशातील द्रवाचे तपासणी नमुने पॉझिटीव्ह प्राप्त झाले आहेत. या रुग्णांची रक्ततपासणी व घशातील द्रावाची तपासणी मुंबई येथील हाफकिन येथील प्रयोगशाळेत करण्यात आली. त्यामुळे कुदळवाडी येथे गोवर आजाराचा उद्रेक घोषित करण्यात आला आहे.

यापूर्वी राज्यातील इतर शहरात आजाराचा उद्रेक लक्षात घेता गोवर आजाराची लक्षणे आढळून आलेल्या रुग्णांच्या रहिवास क्षेत्रात महापालिकेमार्फत यापूर्वीच सर्व्हेक्षण सुरु करण्यात आले आहे. सर्व्हेक्षण करण्यात येणाऱ्या क्षेत्रामध्ये 9 महिने ते 5 वर्षे या वयोगटातील गोवर सदृश्य आजाराची लक्षणे आढळून येणाऱ्या बालकांचे सर्व्हेक्षण त्यांचे गोवर प्रतिबंधक लसीकरणाचा आढावा घेऊन गोवर लसीकरणाचे डोस पूर्ण करणे. तसेच बालकांना जिवनसत्व ‘अ’ डोस देणे इ. बाबींचा समावेश होतो.

Pimpri News : नेहरुनगर येथे पाण्याची पाईपलाईन फुटली, हजारो लीटर पाणी वाया

19 नोव्हेंबर 2022 पासून आजतागायत संपूर्ण शहरामध्ये सर्व्हेक्षण केले आहे. 78 हजार 398 घरांचे सर्व्हेक्षण केले. तर, 2 लाख 93 हजार 931 नागरिकांचे सर्व्हेक्षण केले.(Pimpri News) 5 वर्षाखालील सर्व्हेक्षण केलेल्या बालकांची संख्या  16 हजार 470 आहे.  आजाराचा प्रसार होऊ नये म्हणून वैद्यकीय विभागामार्फत कार्यवाही करण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरुन जाऊ नये, असे आवाहन आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे यांनी केले.

 गोवर आजाराबाबत ही काळजी घ्या

गोवर हा वेगाने पसरणारा आजार आहे. पॅरामिक्सो व्हायरसमुळे हा आजार होतो. हा विषाणू सर्वप्रथम श्वसनमार्गाला संक्रमित करतो. अंगावर लाल पुरळ किंवा लाल रंगाचे रॅशेस येणं या आजाराची प्रमुख लक्षणं मानली जातात. सुरुवातीला मुलांना खोकला आणि सर्दी ही लक्षणं दिसतात.(Pimpri News) तसेच डोळे लाल होऊ शकतात.बालकांमध्ये अशक्तपणा जाणवतो. गोवर सदृश लक्षणे आढळून आलेल्या बालकांना जिवनसत्व ‘अ’ चे दोन डोस 24 च्या अंतराने देणे आवश्यक आहे.

प्रामुख्याने पाच वर्षाखालील बालकांमध्ये हा आजार आढळत असल्याने कुटुंबियांनी गोवरच्या लक्षणांवर लक्ष ठेवावं. मुलांना गोवरची लक्षणं असल्यास शाळेत आणि इतर कुठल्याही गर्दीच्या ठिकाणी पाठवू नये. तसंच गोवर हा वेगाने पसरणारा आजार असल्याने लहान मुलांमध्ये गोवरची लक्षणं दिसल्यास घाबरुन न जाता बालकास तातडीने नजिकच्या महापालिकेच्या रुग्णालय, दवाखान्यातील वैद्यकीय अधिकाऱ्यांना दाखवावे. घरच्याघरी उपचार किंवा अंगावर काढू नये. कारण गोवर हा संसर्गजन्य आजार आहे.

पिंपरी-चिंचवड शहरामध्ये लहान बालकांना गोवर आजार होऊ नये यासाठी नियमीत लसीकरण कार्यक्रमांतर्गत 9 महिन्यांचे बालक आणि 16 महिन्यांच्या बालकांना गोवर-रुबेला प्रतिबंधक लस दिली जाते. कोणत्याही कारणास्तव पालकांनी ही लस मुलांना दिली नसेल तरी पाच वर्षापर्यंत मुलांना ही लस देता येते.(Pimpri News) सदर लसीकरण विशेषतः दर गुरुवारी तसेच मनपा दवाखाना, रुग्णालयाने निश्चित केलेल्या ठिकाणी सकाळी 9.30 ते दुपारी 3.30 या कालावधीत मोफत उपलब्ध आहे. त्यामुळे लहान मुलांमध्ये लक्षणं नसली तरीही बालकांचे लसीकरण करून घ्यावे.

शहरातील खाजगी वैद्यकीय व्यावसायिक, बालरोगतज्ञ यांचे दवाखाना / रुग्णालयात गोवर सदृश लक्षणे असलेली बालके आढळल्यास त्यांनी त्वरित नजिकच्या मनपा दवाखाना / रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी यांना कळवावे. तसेच महानगरपालिकेचे आरोग्य कर्मचारी ( आशा, ए.एन.एम.) घरोघरी जाऊन घरातील बालकास गोवर सदृश लक्षणे आहेत काय याबाबत सर्व्हेक्षण करत आहेत आणि ज्या बालकांचे गोवर लसीकरण राहिले असल्यास त्यांचे लसीकरण करत आहेत. यासाठी नागरिकांनी घरी येणाऱ्या कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे असे महापालिकेतर्फे आवाहन करण्यात आले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.