Pune : पूरामुळे पुणे विभागात आतापर्यंत 40 जणांचा मृत्यू

ब्रम्हनाळ दुर्घटनेतील मृतांची संख्या 17; आज नव्याने 5 मृतदेह सापडले

एमपीसी न्यूज – पुणे विभागात आतापर्यंत 40 जणांचा मृत्यू झाला आहे. ब्रह्मनाळ दुर्घटनेतील मृतांची संख्या 17 वर पोहोचली आहे. आज आणखी पाच मृतदेह सापडले आहेत. मयतांमध्ये कोल्हापूर 6 मयत बेपत्ता 1, सांगलीत मयत 19, 1 बेपत्ता, सातारा 7 मयत 1 बेपत्ता आहे. तर पाण्याची पातळी वेगाने कमी होत असून तासाला एक इंच पाणी कमी होत आहे. सांगली काल पाण्याची पातळी 56 फूट होती आज दुपारी 53 वर आलीय
सांगलीची धोक्याची पातळी 45 वर आहे. तर कोल्हापूर 51.10 फूट होती 49.18 वर आली आहे. धोक्याची पातळी 43 वर आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांनी दिली आहे. 

दरम्यान, पुणे महापालिकेचे 104 तर पिंपरी-चिंचवड महापालिकेचे जवळपास 100 कर्मचारी मदत कार्यासाठी कोल्हापूर सांगलीसाठी रवाना झाले आहेत. सर्व पूरग्रस्तांना मदतीपैकी 5 हजार रोख स्वरूपात दिले जातील आणि उर्वरित बँक खात्यात जमा केले जातील. मंगळवारपासून या वाटपाला सुरुवात होणार आहे. सांगली, कोल्हापूरत चलन तुटवडा निर्माण होणार नाही याची पूर्ण काळजी घेतली जाईल. कोणत्याही खातेदाराला पैसे काढण्यास अडचण निर्माण होणार नाही. बँकेने पासबुक अथवा चेकचा आग्रह धरू नये यासंबंधी सूचना देण्यात आल्या आहेत. पैसे वाटपात पोलीस मदत लागली तर ती पुरवली जाईल.

महामार्गावरील 5400 वाहनांना दुसऱ्या मार्गाने वळवण्यात आले. सध्या 4000 वाहने अजूनही रस्त्यावर आहेत. सांगलीत मिरजचा पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. तर कोल्हापूरसाठी विद्यापीठचा पाणीपुरवठा पुरवण्यास सुरुवात केली आहे. या दोन्ही भागातील स्वच्छतेसाठी टेंडर काढण्यात येईल, अशी माहिती देण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.