India China faceoff : अखेर चीनने केली गलवानमधील मृत सैनिकांची नावे जाहीर

एमपीसी न्यूज : गतवर्षी लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (LAC) चिनी सैन्याने घुसखोरीचा प्रयत्न केल्याने तणाव निर्माण झाला होता.   या तणावादरम्यान, भारतीय लष्कर (Indian Army) आणि चिनी सैन्यामध्ये (PLA) हिंसक झटापट झाली होती. या झटापटीत भारताच्या २० जवानांना वीरमरण आले होते. तर चीनचेही अनेक सैनिक मारले गेल्याचा दावा करण्यात येत होता. मात्र चीन सरकारकडून या झटापटीत चिनी सैन्याची जीवितहानी झाल्याचे वृत्त सातत्याने नाकारले जात होते. मात्र आता चिनी सरकारने या झटापटीत आपले सैनिक मारले गेल्याचे कबूल केले आहे. तसेच या सैनिकांची नावेही जाहीर केली आहेत.  

मात्र भारतीय लष्कर आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरून चिनी सैन्याच्या झालेल्या जीवितहानीबाबत देण्यात येत असलेल्या आकड्यापेक्षा वेगळी आकडेवारी चिनी सरकारकडून जाहीर करण्यात आली आहे. चीनने गलवानमधील झटापटीत आपले चार सैनिक मारले गेल्याचे म्हटले आहे. तसेच या सैनिकांची नावेही जाहीर केली आहेत.

ग्लोबल टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार चीनच्या केंद्रीय सैन्य आयोगाने काराकोरम पर्वतावर तैनात असलेल्या पाच चिनी सैनिकांच्या बलिदानाची आठवण केली आहे. या सैनिकांची नावे पुढीलप्रमाणे आहेत. पीएलए शिनजियांग मिलिट्री कमांडचे रेजिमेंटल कमांडर क्युई फबाओ, चेन होंगून, जियानगाँग, जिओ सियुआन आणि वँग जुओरन या चार जणांचा गलवानमधील झटापटीत मृत्यू झाला. तर एका सैनिकाचा मृत्यू हा मदतकार्यादरम्यान झाला आहे.

दरम्यान, भारतीय लष्कराच्या नॉर्दन कमांडचे चीफ लेफ्टनंट जनरल वाय. के. जोशी यांनी सांगितले की, गलवान खोऱ्यातील झटापटीनंतर ५० चिनी सैनिकांना वाहनांमधून नेण्यात आले होते. मात्र ते जखमी होते की मृत होते हे सांगणे कठीण आहे. वाय. के. जोशी यांनी रशियन एजन्सी ळअरर ने सांगितले या झटापटीत ४५ चिनी सैनिक मारले गेल्याचा दावा करण्यात आला होता. आमचाही तेवढाच अंदाज आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.