Ganeshostav 2020: पहाटे साडेचार ते दुपारी दीडपर्यंत करता येईल गणरायाची प्रतिष्ठापना- पंचांगकर्ते दाते

गौरी विसर्जनाबरोबर गणपती विसर्जन असता तो कितवाही दिवस असताना आणि कोणताही वार असताना त्या दिवशी विसर्जन करता येते.

एमपीसी न्यूज- विघ्नहर्ता श्री गणेशाच्या स्वागतासाठी घरोघरी लगबग सुरू आहे. शनिवारी (दि.21) शाडू किंवा मातीच्या गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना पहाटे साडेचार पासून ते दुपारी 1.30 वाजेपर्यंत सोयीने करता येईल. त्या करिता भद्रादी (विष्टि) कोणतेही कुयोग वर्ज्य करण्याची किंवा विशिष्ट मुहूर्त वेळेची आवश्यकता नाही. सार्वजनिक मंडळांना दुपारनंतरही प्रतिष्ठापना करता येईल, अशी माहिती पंचांगकर्ते मोहन दाते यांनी दिली आहे.

पार्थिव गणेश स्थापना व पूजन करण्यासाठी विशिष्ट मुहूर्त नाही. प्रात:कालापासून मध्याह्नापर्यंत कोणत्याही वेळी स्थापना व पूजा करता येते. त्यासाठी विशिष्ट नक्षत्र, योग, विष्टि करण आदी वर्ज्य नाहीत, म्हणून ते पाहू नयेत. गणपतीला एकवीस मोदकांचा नैवेद्य दाखवितात. या प्रसंगी त्याची दहा नावे गुंफलेला पुढील मंत्र म्हणून त्यास एकवीस दूर्वा अर्पण करतात.

गणाधिप नमस्तेऽस्तु उमापुत्राघनाशन । एकदन्तेभवक्त्रे च तथा मूषकवाहन ।।
विनायकेशपुत्रेति सर्वसिद्धिप्रदायक । कुमारगुरवे तुभ्यं पूजयामि प्रयत्नतः ।।

हा उत्सव प्रामुख्याने दीड दिवस असतो. म्हणजे गणेशचतुर्थीच्या दिवशी पूजिलेला गणपती दुसऱ्या दिवशी सायंकाळी विसर्जित करतात. कित्येक घरी पाच, सात, नऊ व दहा दिवसही गणपती ठेवून त्याची पूजा करतात. कित्येक कुटुंबात ज्येष्ठा गौरीच्याबरोबर गणपतीचे विसर्जन होते. गौरी विसर्जनाबरोबर गणपती विसर्जन असता तो कितवाही दिवस असताना आणि कोणताही वार असताना त्या दिवशी विसर्जन करता येते.

घरामध्ये गर्भवती स्त्री असतानाही गणपती विसर्जन करावे. अशा वेळेस विसर्जन न करण्याची प्रथा चुकीची आहे. ही प्राणप्रतिष्ठा करून बसविलेली मूर्ती उत्तरपूजा करून देव्हाऱ्यातून खाली काढतात व तिचे पाण्यात विसर्जन करतात. वाहत्या पाण्यामध्ये विसर्जन करावे असे नसून पाण्यात विसर्जन करावे असे आहे. त्यामुळे तलावात किंवा स्वतंत्र टॅंकमध्ये, तसेच घरी मोठ्या बादलीमधील पाण्यात सुद्धा विसर्जन करता येते.

विसर्जनानंतर ती मूर्ती पाण्यात विरघळणे आवश्यक असल्याने शाडूची किंवा मातीची मूर्ती असावी. प्लॅस्टर ऑफ पॅरिस किंवा तत्सम पाण्यात न विरघळणाऱ्या पदार्थांची मूर्ती नसावी. तसेच मातीची किंवा शाडूची 3/4 इंच उंचीची लहान मूर्ती आणून त्याची प्राणप्रतिष्ठा करून पूजन करता येईल आणि कोणत्याही धातूच्या मोठ्या मूर्तीचे उत्सव मूर्ती म्हणून पूजन करता येईल आणि आरास करता येईल.

पाण्यात विसर्जन मात्र लहान मूर्तीचे करावे आणि धातूची श्रीगणेश मूर्ती पुन: शोकेस मध्ये ठेवून द्यावी. लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्यपूर्व काळात अनंत चतुर्दशीपर्यंत गणपती उत्सव सार्वजनिक स्वरूपाचा केल्याने अनंत चतुर्दशीला उत्सवाचे स्वरूप आले आहे. वास्तविक हा दिवस अनंत पूजन व्रताचा आहे.

मंगळवारी (दि.25) दुपारी 1.59 नंतर गौरी आवाहन

गौरी (महालक्ष्मी) पूजन :- भाद्रपद महिन्यात अनुराधा नक्षत्रावर गौरीचे आवाहन करून ज्येष्ठा नक्षत्राचे दिवशी गौरी पूजन केले जाते आणि मूळ नक्षत्रावर विसर्जन केले जाते. काही प्रांतात सप्तमीच्या दिवशी आवाहन, अष्टमीला गौरी पूजन करून नवमीला विसर्जन केले जाते.

शाडूचे किंवा पितळी असे देवीचे दोन मुखवटे उभे करून किंवा सुगड / तांब्यावर ठेवून पूजन केले जाते. काही जणांकडे 5 खडे वाटीत ठेवून पूजन केले जाते.

यामध्ये श्रावण मासातील शुक्रवारी काही जणांकडे महालक्ष्मी स्थापना केली जाते ती लक्ष्मी व भाद्रपदात अनुराधा नक्षत्रावर आणलेली गौरी अशा ज्येष्ठा / कनिष्ठा म्हणून दोन देवींची पूजा केली जाते. तसेच काही जणांकडे भाद्रपद महिन्यात ज्येष्ठा / कनिष्ठा लक्ष्मी भगिनींची पूजा केली जाते. ती नंतर 16 दिवस करावयाची असते आणि रोज 1 दोरा पूजेत घ्यावयाचा असतो. मात्र सध्याच्या काळात ज्येष्ठा नक्षत्रावर 16 दिवसांचे प्रतीक म्हणून 16 गाठी मारलेला तातू पूजेत घेऊन नंतर तो दुसऱ्या दिवशी हातात बांधतात.

या देवीची पूजा, कुलधर्म, कुलाचार पद्धतींमध्ये मोठ्या प्रमाणात विविधता दिसून येते.

अनेकांकडे गौरीपुढे नैवेद्य दाखवून तो दिवसभर ठेवून दुसऱ्या दिवशी खाण्याची प्रथा आहे. पण ताट तसेच ठेवून दुसऱ्या दिवशी प्रसाद घेणे योग्य वाटत नाही. कारण कोणत्याही देवतेला नैवेद्य समर्पण केल्याबरोबर त्या देवतेने नैवेद्य स्वीकारलेलाच असतो आणि त्यानंतर लगेच प्रसाद म्हणून तो आपण घेऊ शकतो.

गौरी विसर्जनाची मर्यादा काही वेळेस सकाळी लवकर असते अशा वेळेस मंत्रांनी जागेवर गौरीविसर्जन करून घ्यावे आणि नंतर संध्याकाळी प्रथेप्रमाणे आवरून ठेवावे किंवा जलाशयात विसर्जन करावे.

यंदाचे गणेशोत्सवातील महत्वाचे दिवस –

22 ऑगस्ट 2020, शनिवार – श्रीगणेश चतुर्थी
या दिवशी पहाटे 4.30 पासून दुपारी 1.30 पर्यंत कधीही घरगुती गणेशाची स्थापना करता येईल.

25 ऑगस्ट 2020, मंगळवार – गौरी आवाहन
दुपारी 1.59 नंतर परंपरे प्रमाणे गौरी आवाहन करावे.

26 ऑगस्ट 2020, बुधवार – गौरी पूजन

27 ऑगस्ट 2020, गुरुवार – गौरी विसर्जन
दुपारी 12.37 नंतर गौरी विसर्जन करावे.

1 सप्टेंबर 2020, मंगळवार – अनंत चतुर्दशी
मंगळवार हा गणेशाचा वार असला तरीही परंपरे प्रमाणे ज्यांचे या दिवशी विसर्जन असते त्यांनी विसर्जन करावे.

 

दीड दिवसाचा गणेशोत्सव केल्यावर देखील परंपरे प्रमाणे महालक्ष्मी / गौरी आवाहन-पूजन करता येते.

यावर्षी कोरोना संकटामुळे ज्याप्रमाणे अनेक बदल आपण अंगिकारले त्या प्रमाणे गणेश उत्सवात सुद्धा आपणास बदल करावा लागेल, तेव्हा अशा प्रकारे श्री गणेशाचे पूजन करुन त्या विघ्नहर्त्याकडे कोरोनाचे संकट जावे अशी प्रार्थना करू या !

पुढच्या वर्षी 10 सप्टेंबर 2021 रोजी शुक्रवारी श्रीगणेश चतुर्थी आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.