Gangs Of Filmistan: ‘गॅग्स ऑफ फिल्मीस्तान’ वादाच्या भोव-यात

निर्माते सातत्याने कलाकारांशी खोटं बोलत आहेत. सुरुवातीला आम्हाला फक्त आठवड्यातून दोन दिवस काम करावं लागेल असं सांगण्यात आलं होतं.

एमपीसी न्यूज – विनोदी अभिनेता कपिल शर्मा याच्या साथीने प्रसिद्ध झालेला आणखी एक हास्य अभिनेता सुनील ग्रोवर ‘गॅग्स ऑफ फिल्मीस्तान’ या रिअ‍ॅलिटी शोच्या माध्यमातून छोट्या पडद्यावर पुनरागमन करत आहे. या शोचं 31 ऑगस्टपासून प्रसारण सुरु झाले आहे. परंतु, हा शो आता वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. या शोमध्ये काम करणाऱ्या अभिनेत्री शिल्पा शिंदे हिने सुनील ग्रोवरसोबत काम करण्यास नकार दिला आहे.

‘निर्मात्यांनी मला फसवलं आहे. या शोमध्ये कलाकारांचं मानसिक शोषण केलं जात आहे.’ असे आरोप शिल्पाने केले आहेत. ‘भाभीजी घर पर है’ या विनोदी मालिकेतून ‘सही पकडे है’ म्हणत नावारुपास आलेली शिल्पा शिंदे सध्या ‘गॅग्स ऑफ फिल्मीस्तान’ या शोमुळे चर्चेत आहे.

‘टाइम्स ऑफ इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत तिने या शोच्या निर्मात्यांविरोधात संताप व्यक्त केला आहे. ती म्हणाली, ‘निर्माते सातत्याने कलाकारांशी खोटं बोलत आहेत. सुरुवातीला आम्हाला फक्त आठवड्यातून दोन दिवस काम करावं लागेल असं सांगण्यात आलं होतं.

पण आता आमच्याकडून 12-12 तास काम करुन घेतलं जात आहे. या शोचं केंद्रस्थान सुनील ग्रोवर आहे. आम्ही फक्त मागे उभं राहून टाळ्या वाजवण्याचं काम करत आहोत. इतक्या दिवसांत मला स्क्रिप्ट देखील मिळाली नाही. अशा शोमध्ये मी दीर्घ काळ काम करु शकत नाही. निर्मात्यांनी मला फसवलं आहे. या शोमध्ये कलाकारांचं मानसिक शोषण केलं जात आहे’.

शिल्पा शिंदे छोट्या पडद्यावरील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. 2002 साली तिने ‘भाभी’ या मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केलं होतं. त्यानंतर तिने ‘लापता गंज’, ‘हातिम’, ‘संजीवनी’, ‘मेहेर’, ‘कानपुर वाले खुरानाज’ यांसारख्या अनेक मालिकांमध्ये काम केलं. ‘बिग बॉस’ आणि ‘भाभीजी घर पर है’ या दोन मालिकांमुळे ती खऱ्या अर्थाने प्रकाशझोतात आली होती. सध्या ती ‘गॅग्स ऑफ फिल्मीस्तान’ या शोमध्ये काम करत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.