Nigdi News: सज्जनशक्ती एकत्रित झाली पाहिजे!-ह.भ.प. श्रेयस बडवे

एमपीसी न्यूज : “समाजातील सज्जनशक्ती एकत्रित झाली पाहिजे!” असे विचार ह.भ.प. श्रेयस बडवे यांनी श्रीराम मंदिर, पेठ क्रमांक 27, निगडी प्राधिकरण येथे शुक्रवार, दिनांक 09 डिसेंबर रोजी व्यक्त केले. पाच दिवसीय नारदीय परंपरेतील कीर्तन महोत्सवात द्वितीय पुष्पाचे निरूपण ह.भ.प. श्रेयस बडवे यांनी केले. अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष सचिन कुलकर्णी, मुकुंद इनामदार, रविकांत कळंबकर, राजेंद्र बाबर आणि माजी नगरसेविका शर्मिला बाबर यांची प्रमुख उपस्थिती होती.

“चंचल हे मन | रामनामी लावा | तेणे तो विसावा | लाभे जीवा |”

या समर्थ रामदासस्वामी रचित पदावर निरूपण करताना श्रेयस बडवे म्हणाले की, ‘”माणूस हा विचारशील प्राणी आहे’ , असे तत्त्वज्ञ ॲरिस्टॉटल यांनी म्हटले होते; तर ‘माणूस हा विवेकाने विचार करणारा व्युत्पन्नचित्त सजीव आहे’ असे शंकराचार्य मानतात. विवेकाने वागण्यासाठी माझे मन कसे ताब्यात ठेवू, असा प्रश्न अर्जुनाने भगवान श्रीकृष्ण यांना विचारला होता. सद्गुरू गोंदवलेकर महाराज सांगतात की, ‘मनरूपी चंचल माकडाला रामनामरूपी खांबाला बांधून ठेवले पाहिजे’; कारण या भूतलावर कीर्तिरूपी उरण्यासाठी मनावर ताबा ठेवून सत्कर्म केले पाहिजेत. ज्ञानोबा आणि त्यांच्या भावंडांना संन्याशाची पोरे म्हणून समाजाने छळले; तर तुकोबा निष्कांचन झाले; पण त्यांनी कधीही समाजाप्रति मनांत कटुता बाळगली नाही.

Khed News: दामदुपटीचे आमिष दाखवून मित्रानेच केली डॉक्टरची साडे पंधरा लाखांची फसवणूक

श्रीराम प्रभू यांना जीवनात अनेक संकटांचा सामना करावा लागला; पण त्यांच्या मनाचा तोल कधीही ढळला नाही. रामाचे जीवन आणि आपली भारतीय संस्कृती त्यागाचे प्रतीक आहे!” कीर्तनाच्या उत्तररंगात त्यांनी हनुमान-अर्जुन आख्यान कथन केले. “जीवनात आनंद अन् समाधान हवे असेल तर भगवंताच्या नामस्मरणाला पर्याय नाही!” असे प्रतिपादन करताना श्रेयस बडवे यांनी सरस्वती, अडाणा, मालकंस अशा वैविध्यपूर्ण रागदारीतील पदांच्या सुश्राव्य गायनाने श्रोत्यांना उत्कट श्रवणानंद दिला. त्यांना कानिफनाथ घैसास (तबला) आणि धनवर्षा प्रभुणे (संवादिनी) यांनी साथसंगत केली. श्रीराम मंदिर विश्वस्त मंडळाने संयोजनात सहकार्य केले. संजय दातार यांनी सूत्रसंचालन केले. विशेष बाब म्हणजे कार्यक्रमाच्या दरम्यान काही काळ विद्युतपुरवठा खंडित झाला असताना श्रोत्यांनी विचलित न होता विविध स्तोत्रे, अभंग आणि भक्तिगीतांचे सामुदायिक पठण केले. सामुदायिक आरतीने द्वितीयपुष्पाचा समारोप करण्यात आला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.