Good News : आता चार दिवस काम, तीन दिवस सुटीचा कायदा विचाराधीन!

एमपीसी न्यूज : कृषी क्षेत्रात सुधारणा करण्यासाठी नवे कायदे केल्यानंतर मोदी सरकार कामगार कायद्यांमध्ये बदलाची तयारी करत आहे. भारतात चार दिवस काम, तीन दिवस सुटीची तरतूद करणारा कामगार कायदा करण्याबाबत मोदी सरकार विचार करत आहे. 

चार दिवस काम, तीन दिवस सुटी हा कायदा झाल्यास चार दिवस दररोज 12 तास ड्युटी आणि 3 दिवस सुटी अशी व्यवस्था असेल. महिला सुरक्षा, आरोग्य या बाबी विचारात घेऊन कायद्यात विशिष्ट तरतुदी केल्या जाण्याची शक्यता आहे. कामगार खात्याचे सचिव अपूर्व चंद्रा यांनी नव्या कामगार कायद्याचा विचार सुरू असल्याचे सांगितले.

भारतातील औद्योगिकरण आणि सेवा क्षेत्र या दोन्हीचा वेगाने होणारा विस्तार, तंत्रज्ञानामुळे बदलणारी परिस्थिती, वाहतुकीच्या सोयीसुविधा, वीज आणि पाण्याची उपलब्धता, आरोग्य सेवांची उपलब्धता, महिलांची सुरक्षा या बाबींचा विचार करुन नवे कामगार कायदे केले जातील. भविष्यातील आव्हानांचा विचार करुन हे कायदे तयार केले जातील.

सध्या आठवड्याचे किमान 48 तास काम करण्याचा कामगार कायदा आहे. दररोज 8 तास या पद्धतीने आठवड्यातील सहा दिवस काम केल्यानंतर एक दिवसाची सुटी दिली जाते. नव्या कायद्यात चार दिवस दररोज 12 तास ड्युटी आणि 3 दिवस सुटी अशी व्यवस्था असेल. यामुळे आठवड्याचे किमान 48 तास काम करण्याच्या बंधनात बदल होणार नाही पण विश्रांती घेण्यासाठी तसेच घरच्यांना वेळ देण्यासाठी पुरेसा अवधी कामगारांना मिळेल.

कंपन्यांना 12 तासांच्या चार दिवसांऐवजी 10 तासांचे पाच दिवस हा पर्याय पण उपलब्ध असेल, अशी शक्यता व्यक्त होत आहे. जर पाच दिवस काम अशी व्यवस्था असेल तर कामगारांना 2 दिवसांची सुटी मिळेल. पण या व्यवस्थेत आठवड्याचे 50 तास काम होईल.

काही ठिकाणी कंपन्यांना तर काही ठिकाणी कर्मचाऱ्यांना रोजच्या ड्युटीचे स्वतःचे तास निश्चित करण्यासाठी दोन किंवा तीन पर्याय दिले जातील. यात 8 तासांचे सहा दिवस, 10 तासांचे पाच दिवस आणि 12 तासांचे चार दिवस असे पर्याय असतील. सहा दिवस निवडल्यास एक सुटी, पाच दिवस निवडल्यास दोन दिवसांची सुटी आणि चार दिवस निवडल्यास तीन दिवसांची सुटी मिळेल.

सध्या १०० किंवा त्यापेक्षा जास्त कामगार असलेल्या कंपनीला कारभार बंद करण्यासाठी सरकारी परवानगी घ्यावी लागते. लहान कंपन्यांना हे बंधन लागू नाही. नव्या कायद्यात 300 किंवा त्यापेक्षा जास्त कामगार असलेल्या कंपनीला कारभार बंद करण्यासाठी सरकारी परवानगी घ्यावी लागेल. पण 300 पेक्षा कमी कामगार असलेल्या कंपनीला हे बंधन लागू नसेल. ही शक्यता व्यक्त होत आहे. अद्याप नव्या कामगार कायद्याचा प्रस्ताव जाहीर झालेला नाही. नव्या कायद्यात संपासाठी किमान 60 दिवस आधी लेखी नोटीस देण्याचे बंधन कामगार संघटनांना लागू असेल, अशीही शक्यता व्यक्त होत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.