Grampanchayat Election News : मतदानाच्या दिवशी ग्रामपंचायत क्षेत्रातील आठवडे बाजारावर बंदी

एमपीसी न्यूज – पुणे जिल्हयातील ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक प्रक्रियेदरम्यान मतदान केंद्राच्या परिसरात कायदा व सार्वजनिक सुव्यवस्था राखण्यासाठी मतदानाच्या दिवशी (शुक्रवार, दि. 15 जानेवारी) शिरुर, वेल्हा, आंबेगाव, जुन्नर, दौंड, इंदापूर व बारामती तालुक्यातील आठवडे बाजार भरविण्यावर बंदी घालण्यात आली आहे.

याबाबतचा मनाई आदेश जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिला आहे.

राज्यातील ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीसाठी शुक्रवारी मतदान प्रक्रिया होणार आहे. दरम्यान बुधवारी (दि. 13) दुपारी साडेपाच वाजता प्रचारतोफा थंडावल्या आहेत. ग्रामपंचायत निवडणुका शांततेत पार पाडण्यासाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे.

शिरुर तालुक्यातील मांडवगण फराटा, पाबळ, वेल्हा तालुक्यातील वेल्हे बु., आंबेगाव तालुक्यातील घोडेगाव, जुन्नर तालुक्यातील आळे, निमगांव सावा, दौंड तालुक्यातील यवत, इंदापूर तालुक्यातील रुई व निरगुडे तसेच बारामती तालुक्यातील सांगवी गावामधील आठवडे बाजार भरविण्यास मनाई करण्यात आली आहे.

त्यापुढील शुक्रवार (दि. 22 जानेवारी 2021) पासून आठवडे बाजार पूर्ववत भरविण्यात यावेत, असेही जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी दिलेल्या आदेशात म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.