Chikhali : चिखली घरकुलमधील पोलीस स्टेशनला ‘हिरवा झेंडा’

एमपीसी न्यूज – चिखली घरकूल येथील मोकळ्या जागेत पोलीस (Chikhali)ठाणे उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे परिसरातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी मदत होणार असून, त्यामुळे सुमारे 30 हजार घरकुलवासीयांना दिलासा मिळाला आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाने चिखली से. क्र. 17 व 19 येथे आर्थिकदृष्टया दुर्बल घटकांसाठी (EWS) प्रकल्प राबवला आहे. या प्रकल्पात एकूण 158 इमारती असून, 153 इमातींमधील लाभार्थींना सदनिकांचे वाटप करण्यात आले आहे. दरम्यान, या प्रकल्पातील नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या पोलीस स्टेशनसाठी जागा उपलब्ध करुन द्यावी, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी केली होती.

वास्तविक, निगडी पोलीस ठाण्याचे विभाजन करुन चिखली पोलीस (Chikhali) ठाण्याची निर्मिती केली आहे. सध्यस्थितीला चिखली पोलीस ठाणे स. नं. 774, एस.टी.पी. बिल्डिंग, सी व्हींग, पुर्णानगर, चिंचवड येथील जागेवर भाडेतत्त्वावर सुरू आहे.

त्यामुळे चिखली पोलीस ठाण्याकरिता से. क्र. 17, स्पाईन रोडलगत, घरकूल गेटसमोर महापालिकेच्या ताब्यात असलेले 20. आर. मोकळी जागा मिळावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते निलेश नेवाळे आणि फेडरेशन ऑफ घरकूलचे अध्यक्ष नारायण धुरी यांनी केली होती. स्थानिक नागरिकांची मागणी लक्षात घेवून प्रशासनाने सकारात्मक कार्यवाही करावी, अशा सूचना आमदार लांडगे यांनी केल्या होत्या.

दरम्यान, पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाकडून प्राप्त सुधारित बांधकाम परवानगीनुसार चिखली से. क्र. 17 व 19 येथील प्रकल्पामधील मुख्य प्रवेशद्वाराजवळील उजव्या बाजूची 2661. 78 चौ. मी. इतकी जागा खेळाचे मैदान आरक्षण विकसित करण्याकरिता आरक्षित आहे.

त्या जागेतील एकूण 15 गुंठे जागा पोलीस स्टेशनच्या उभारणीकरता उपलब्ध करण्याच्या प्रस्तावाला आयुक्त शेखर सिंह यांनी मान्यता दिली. त्यामुळे चिखली स्टेलीस स्टेशनला हक्काची जागा मिळाली आहे.

चिखली घरकूल परिसरातील नागरिकांना सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस ठाण्याची आवश्यकता होती. कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी चिखली पोलीस ठाणे हक्काच्या जागेत उभारण्याकरिता स्थानिक नागरिकांसह आम्ही पाठपुरावा केला.

सामाजिक कार्यकर्ते निलेश नेवाळे, फेडरेशन ऑफ घरकुलचे अध्यक्ष नारायण धुरी यांनी सातत्याने पाठपुरावा केला. आता प्रशासनाने सदर कार्यवाही पूर्ण करुन पोलीस स्टेशनची इमारत उभारण्याच्या कामाला गती द्यावी, अशी अपेक्षा आहे, असे आमदार महेश लांडगे म्हणाले.

Mahalunge : शेतात दारुच्या बाटल्या टाकल्याचा जाब विचारला म्हणून शेतकऱ्याला बेदम मारहाण

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.