City Cup 2021 : गनर्स, केपी इलेव्हन, जीओजी एफसीसी संघांची आगेकूच

एमपीसी न्यूज – प्रथम श्रेणीत खेळणाऱ्या गनर्स संघाने सिटी कप 2021 स्पर्धेत सनसनाटी निकाल नोंदवताना अव्वल श्रेणीतील परशुरामियन्स एफसी संघाचा पराभव केला. त्याचबरोबर गेम ऑफ गोल एफसीसी (जीओजी) आणि केपी इलेव्हन संघांनी विजय मिळवून आपली आगेकूच कायम राखली. सिटी कप 2021 ही बाद फेरीची स्पर्धा पु्ण्यातील मोशी येथील सिटी स्पोर्टंस अरेना येथे सुरू आहे. पुणे जिल्हा फुटबॉल संघटनेच्या वतीने सिटी एफ.सी. पुणे संघाने या स्पर्धेचे आयोजन केले आहे.

गनर्स संघाने उत्तरार्धात जयंत निंबाळकरने नोंदवलेल्या दोन गोलच्या जोरावर परशुरामियन्स एफसी संघाचा 5-2 असा पराभव केला. अर्थात, सामन्याचा पहिला गोल परशुरामियन्सच्या सॅमसन जोसेफ याने 10व्या मिनिटाला केला. त्यानंतर 21 व्या मिनिटाला हर्षल वाळवेकर याने गनर्सला बरोबरी राखून दिली.

अझिम मुल्लाने लगोलग 26 व्या मिनिटाला गोल करून गनर्सला आघाडी मिळवून दिली. अॅलन राघवेंद्र (30वे) याने आणखी एक गोल करून गनर्सची आघाडी भक्कम केली. पुर्वार्धाच्या अखेरच्या मिनिटाला यासिर खानने 35व्या मिनिटाला गोल करून परशुरामियन्सच्या बरोबरीच्या आशा पल्लवित केल्या. विश्रांतीला गोलफलक 3-2 असा होता. उत्तरार्धात मात्र जयंतच्या दोन गोलने गनर्सने विजय निश्चित केला.

केपी इलेव्हन संघाने यजमान सिटी एफ. सी. पुणे संघांच्या आशांना सुरुंग लावला. दोन्ही सत्रात एकेक गोल करताना केपी इलेव्हन संघाने 2-0 असा विजय मिळविला. एडिवने फालेरो याने 20व्या मिनिटाला, तर उत्तरार्धात अल्फ्रेड नेगल याने 49व्या मिनिटाला दुसरा गोल केला.

तिसऱ्या सामन्यात जीओजी एफसीसी संघाने पिंपरीच्या राहुल एफसी संघाचा 3-1 असा पराभव केला. आक्रमक प्रकाश थोरातने 15व्या मिनिटाला जीओजीसाठी पहिला गोल केला. त्यानंतर कार्तिक राजूनो 45 आणि 52व्या मिनिटाला दोन गोल केले. या दरम्यान राहुल एफसी साठी नईम सय्यद याने 48व्या मिनिटाला गोल केला.

निकाल –

  • गेम ऑफ गोल (जीओजी) एफसीसी 3 (प्रकाश थोरात 15वे, कार्तिक राजू 45वे, 52वे मिनिट) वि.वि. राहुल एफसी – 1 (नईम सय्यद 48वे मिनिट)
  • केपी इलेव्हन 2 (एडविन फालेरो 20वे, अल्फ्रेड नेगल 49वे मिनिट) वि.वि. सिटी एफ सी पुणे 0
  • गनरस् -5 (हर्षल वाळवेकर 21वे,. अझिम मुल्ला 26वे, अॅलन राघवेंद्र 30वे, जयंत निंबाळकर 45वे, 61वे मिनिट) वि.वि. परशुरामियन्स एफसी 3 (सॅमसन जोसेफ 10वे, यासिर खान 35वे मिनिट)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.