Happy Birthday Devendra Fadnavis: जनतेच्या मनात घर केलेला नेता- देवेंद्र फडणवीस

Happy Birthday Devendra Fadnavis: Leader who has made a place in the minds of the people - Devendra Fadnavis आव्हान कोणतेही असो ते लीलया पेलणे ही त्यांची खासियत. सत्तेवर असताना त्यांच्या या नेतृत्वगुणाची झलक देशाला पाहायला मिळाली.

एमपीसी न्यूज- पक्षाचे प्रदेशाध्यक्षपद असो किंवा मुख्यमंत्रीपद नाहीतर सध्याचं विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद… अभ्यासूपणा आणि आक्रमकता हा स्थायीभाव. ज्या तडफेने राज्यशकट चालवले तेवढ्याच तळमळीने जनतेच्या प्रश्नांसाठी विरोधी पक्षनेते म्हणून विधीमंडळात आपली छाप पाडणारे देवेंद्र फडणवीस कार्यकर्त्यांबरोबरच जनतेलाही आपले वाटतात. नागपूर महापालिकेतून प्रवास सुरु केला. तो राज्याच्या प्रमुखपदापर्यंत आला आणि आता केंद्रातील वाटा त्यांना खुणावताना दिसत आहेत. आव्हान कोणतेही असो ते लीलया पेलणे ही त्यांची खासियत. सत्तेवर असताना त्यांच्या या नेतृत्वगुणाची झलक देशाला पाहायला मिळाली. सर्वाधिक आंदोलने आणि मोर्चांना सामोरे गेलेले मुख्यमंत्री म्हणून कदाचित देवेंद्र फडणवीस यांचेच नाव घेता येईल. इतकी आंदोलन यशस्वीपणे हाताळण्याचा विक्रमही त्यांच्याच नावावर असेल.

स्वच्छ प्रतिमा, अभ्यासू वृत्ती, कुशल युवा राजकारणी आणि आर्थिक धोरणांसह विविध विषयांचा व्यासंग असलेले देवेंद्र फडणवीस. नगरसेवक, सर्वांत कमी वयात महापौर, आमदार, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष पद ते मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते पद असा त्यांचा आतापर्यंतचा राजकीय प्रवास ठरला आहे.

पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये सध्या सुरु असलेल्या मेट्रोच्या कामाला गती फडणवीस यांच्या कार्यकाळातच मिळाली. वर्षानुवर्षे रखडलेला हा प्रकल्प फडणवीस यांनी मार्गी लावला. या प्रकल्पाला पैशांची कमतरता भासू दिली नाही. त्यांनी घेतलेल्या निर्णयामुळेच लवकरच पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये मेट्रो धावताना दिसेल. यामुळे रस्त्यावर पडणारा भारही कमी होईल.

कितीही मोठे संकट असो किंवा आणीबाणीची स्थिती, त्यांच्या चेहऱ्यावर कधी तणाव दिसत नाही. उलट प्रत्येक आवाहनाला ते स्मित हास्याने सामोरे गेल्याचे दिसतात. किंबहुना हेच त्यांचे सामर्थ्य आहे, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.

देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखाली युती सरकारची कामगिरी दमदार राहिली होती. जनतेच्या मनात त्यांनी घर केले होते. त्यामुळे यावेळीही पुन्हा युतीचे सरकार सत्तेवर येणार आणि पुन्हा देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होणार असे जनतेला वाटले होते.

परंतु, निवडणुकीनंतरच्या राजकीय घडामोडींमुळे भाजप-शिवसेना युती सरकार सत्तेवर आले नाही. पण यामुळे निराश न होता देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेचे विरोधी पक्षनेतेपद स्वीकारले आणि महाविकास आघाडी सरकारला पहिल्याच अधिवेशनात धारेवर धरले. विधानसभेच्या पहिल्याच सत्रात पहिल्याच मिनिटापासून विरोधी पक्षनेते म्हणून फडणवीस आक्रमक दिसले. अनेकवेळा त्यांनी सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. माहिती, कायद्याची सखोल जाण, वक्तृत्व यामुळे ते सभागृहात इतरांपेक्षा वरचढ ठरतात.

कोरोना विषाणूमुळे संपूर्ण राज्य स्तब्ध झाले आहे. राज्य सरकारमधील मोजकी मंडळी दौरे काढून प्रभावित क्षेत्राला भेट देत आहे. मात्र, या कठीण समयी राज्याचा जबाबदार विरोधी पक्षनेता म्हणून देवेंद्र फडणवीस आपल्या सहकाऱ्यांबरोबर पायाला भिंगरी लावून संपूर्ण महाराष्ट्र पालथा घालताना दिसत आहे.

गावोगावी जाऊन तेथील कोरोनाच्या स्थितीचा, तेथील सोयीसुविधांचा आढावा घेणे, अधिकाऱ्यांना गैरसोयीबद्दल जाब विचारणे आणि कोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारने काय करायला हवे याच्या मार्गदर्शक सूचना देताना ते दिसत आहेत.

या परिस्थितीत बाहेर फिरणे धोक्याचे असतानाही त्यांनी याची काळजी केली नाही. उलट त्यांनी त्यांचे सहकारी आणि माजी मंत्री गिरीश महाजन यांना फोन करुन आपल्याला कोरोना झाला तर खासगी रुग्णालयात दाखल न करात मुंबईतील सरकारी रुग्णालयात दाखल करण्याची विनंती केल्याचे वृत्त समोर आले. यातून त्यांच्या भावनाही स्पष्ट होतात.

एमपीसी न्यूजच्या वतीने देवेंद्र फडणवीस यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा !

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.