Dapodi : महापालिका 121 वर्ष पूर्ण झालेल्या ‘हॅरीस ब्रिज’ची डागडुजी करणार

सल्लागाराची नेमणूक

एमपीसी न्यूज – पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवडला जोडणा-या दापोडी-बोपोडी दरम्यान मुळा नदीवरील जुन्या हॅरीस ब्रिजची डागडुजी करण्यात येणार आहे. पुलाचे स्ट्रॅक्चरल ऑडिट केले आहे. त्यामध्ये पूल सुस्थितीत ठेवण्यासाठी डागडुजी केली जाणार आहे. कामाची निविदा काढण्यासाठी सी.व्ही.कांड कन्सल्टन्ट यांची प्रकल्प सल्लागार म्हणून नेमणूक करण्यास स्थायी समिती सभेने आज (गुरुवारी) मंजुरी दिली.

पिंपरी-चिंचवड महापालिकेची स्थायी समितीची साप्ताहिक सभा आज पार पडली. सभापती विलास मडिगेरी सभेच्या अध्यक्षस्थानी होते. पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवडला जोडणा-या दापोडी-बोपोडी दरम्यान मुळा नदीवर ब्रिटीशांनी सन 1895 मध्ये ‘हॅरीस ब्रिज’ बांधलेला आहे. या पुलास 121 वर्ष पूर्ण झाली आहेत. अद्यापही हा पूल पूर्ण क्षमतेने वापरात आहे. पुलाचे वयोमान लक्षात घेता या विभागामार्फत पुलाचे स्ट्रॅक्चरल ऑडिट करण्यात आले आहे. जुना पूल सुस्थितीत ठेवण्यासाठी उपाययोजना सुचविल्या आहेत.

_MPC_DIR_MPU_II

त्यामध्ये पुलावरील झाडे-झुडपे काढणे. पुलाशेजारील पुण्याकडील बाजुच्या झोपड्या काढणे. आवश्यकतेनुसार भिंतीची दुरुस्ती करणे, फुटपाथ दुरुस्त करणे, जुन्या व नव्या पुलामधील भाग ‘पिचींग’ करणे, पॅरापेट वॉलची दुरुस्ती करणे, मजबुतीकरण करणे त्याचप्रमाणे पाण्याची पाईपलाईन स्थलांतरित करण्याचे सुचविले आहे. त्यानुसार जुन्या हॅरीस ब्रिजची दुरुस्ती करण्यात येणार आहे. निविदापूर्व व निविदा पश्चात कामासाठी सल्लागार म्हणून सी.व्ही.कांड कन्सल्टन्ट यांची नेमणूक करण्यात आली आहे. याबाबतच्या प्रस्तावाला स्थायी समितीने मान्यता दिली.

त्याचबरोबर 1987 साली बांधलेल्या नवीन पुलाचेही स्ट्रॅक्चरल ऑडिट करण्यात आले आहे. पूल सुस्थितीत ठेवण्यासाठी पॅरापेट वॉलवर ढोलपूर दगडाचे लोपिंग बसविणे. पायर एक पुण्याकडील बाजुची स्वच्छता करणे, पाण्याचा निचरा होण्यासाठी पन्हाळे 200 मी.मी पर्यंत वाढविणे. जुन्या व नवीन पुलामधील भागावर पिचिंग करणे. फुटपाथ दुरुस्त करणे. पॅरापेटजवळील पाण्याची पाईपलाईन स्लॅबने झाकणे, कार्बोनेशन प्रोटेक्शन पेंटने रंगविण्याचा उपाय सुचविला आहे. या कामाची निविदा काढण्यात आली असून कामाला सुरुवात करण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.