Higher light Bill : महावितरणचा भोंगळ कारभार, ग्राहकांना दिला अव्वाचा सव्वा वीज बिलांचा ‘शॉक’

MSEDCL's mismanagement, 'shock' of electricity bills given to customers

एमपीसी न्यूज – लॉक डाउनच्या काळात महावितरण कंपनीने सर्व वीज ग्राहकांना सरासरी प्रमाणे वीज बिल पाठवले होते. ग्राहकांकडून तीन महिन्याचे सरासरी वीज बिल वसूल केल्यानंतर जून महिन्यापासून वीजबिल मीटर रिडींग प्रमाणे आकारू, असे सांगितले होते. मात्र, जून महिन्यात महावितरण कंपनीने पाठवलेले वीजबिल बघून ग्राहकांना चांगलाच ‘शॉक’ बसला आहे.

वीज पुरवठा कंपनी महावितरणकडून ग्राहकांना जून महिन्याचे वीजबिल तब्बल तीनपट जास्त पाठवले आहे. जून महिन्यात मीटरचे रिडींग घेऊन सुद्धा कंपनीने अव्वाचे सव्वा वीज बिल कसे पाठवले, असा सवाल ग्राहक विचारात आहेत.

लॉकडाउनच्या काळात महावितरण कंपनीने सर्व वीज ग्राहकांना सरासरी प्रमाणे वीज बिल पाठवले होते. किंवा महावितरण कंपनीचे मोबाईल अँप्लिकेशन डाउनलोड करून त्यावर मीटर रिडींग पाठवण्यास सांगितले होते.

त्यावेळी सरासरीनुसार आकारण्यात आलेले वीज बिल भरून सुद्धा जून महिन्यात पाठवलेल्या अव्वाचे सव्वा वीज बिलामुळे ग्राहक हैराण झाले आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या तीन महिन्यापासून मीटर रिडींग घेणे बंद केले होते. त्यामुळे नागरिकांना सरासरी प्रमाणे वीज बिल पाठवण्यात आले होते.

ग्राहकांनी सरासरीनुसार आलेले वीज बिल भरले असून त्यांना जून महिन्यात मीटर रिडींग प्रमाणे बिल येणे अपेक्षित होते.

मात्र, महावितरणकडून तब्बल तीन पट जास्त वीज बिल पाठवले आहे. शहरातील रहाटणी, बाणेर, पिंपळे सौदागर, थेरगाव, पाषाण, वाकड, बावधन परिसरातील नागरिकांना महावितरण कडून वाढीव वीज बिल पाठवण्यात आले आहे.

पिंपळे सौदागर येथील रहिवासी असणाऱ्या जॉन डिसुझा यांना सुद्धा पाच हजार रुपयांचे वीज बिल पाठवण्यात आले आहे. त्यांनी या बाबत बोलताना असे सांगितले की, मला नेहमी 1500 रुपयाच्या आसपास वीज बिल येते.

लॉकडाउनच्या काळात दोन वेळा सरासरीनुसार 1700 आणि 1800 असे वीज बिल आले होते. ते मी भरले होते. जून महिन्यात मीटर रिडींग प्रमाणे बिल येणे अपेक्षित होते.

मात्र, महावितरणकडून पाच हजारांचे वीज बिल पाठवण्यात आले आहे. मी याबाबत महावितरण अधिकाऱ्यांना विचारणा केली असता कोणी सरळ उत्तर देत नाहीत. त्यामुळे जाब कुणाला विचारावा, अशी पंचायत झाली आहे.

थेरगाव येथील रहिवासी सुप्रिया राऊत यांना देखील महावितरणकडून 4450 रुपयांचे वीज बिल पाठवण्यात आले आहे.

राऊत म्हणाल्या की, मे महिण्यात सरासरी प्रमाणे पाठवण्यात आलेले बिल आम्ही भरले होते. जून महिण्यात आलेले विज बिला एवढा आमचा वापर नाही तरी देखील आम्हाला वाढीव बिल पाठवण्यात आले आहे.

महावितरण कंपनीचे काय म्हणणे आहे ?

ग्राहकांना पाठवलेले वीज बिल हे योग्य असून त्यामध्ये एप्रिल महिन्याचा वाढलेला दर लागू करण्यात आला आहे. त्यामुळे ते वाढले असू शकते. तरीही ग्राहकांना काही तक्रार असेल तर महावितरणकडून एक लिंक पुरवण्यात आली आहे. त्यावर ते बिलाची शहनिशा करू शकतात. किंवा कार्यालयाला भेट देऊन बिला संबंधी तक्रार करू शकतात. महावितरणच्या कार्यालयातही जाऊन वीजबिलांची आकारणी समजून घेता येईल, असे सांगण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.