Hinjawadi : कॅशियरच्या डोळ्यादेखत हातचलाखी; 36 हजार रुपये लंपास

एमपीसी न्यूज – वर्कशॉप मधील कॅशियरच्या डोळ्यादेखत हातचलाखी करत 786 नंबर असलेली दोन हजार रुपयांची नोट घेण्याच्या बहाण्याने एका बहाद्दराने 36 हजार रुपये लंपास केले. हा प्रकार सोमवारी (दि. 1) चांदणी चौकाजवळ टोयोटा वर्कशॉपमध्ये घडला.

विशाल प्रकाश भालगरे (वय 21, रा. विघ्नहर्ता सोसायटी, आंबेगाव पठार, पुणे. मूळ रा. केंजळ, ता. भोर) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विशाल चांदणी चौकाजवळ असलेल्या टोयोटा कंपनीच्या सर्व्हिस सेंटरमध्ये कॅशियर म्हणून काम करतात. सोमवारी सकाळी दहाच्या सुमारास एक अनोळखी इसम वर्कशॉपमध्ये आला. विशाल यांचे दैनंदिन काम सुरु होते. अनोळखी इसमाने विशाल यांच्याकडे दोन हजार रुपयांची दुसरी नोट मागितली. त्यावेळी विशाल यांनी एक दोन हजारांच्या नोटांचा बंडल बाहेर काढला. आरोपीने नोटांचा बंडल हातामध्ये घेऊन बंडल मधून 786 नंबर असलेली नोट मी काढून घेतो, असे सांगून नोटा पाहू लागला. नोटा बघत असताना आरोपीने दोन हजार रुपयांच्या तब्बल 18 नोटा असे एकूण 36 हजार रुपये चोरले. आरोपी सर्व्हिस सेंटरच्या बाहेर पडल्यानंतर काही वेळाने हा प्रकार विशाल यांच्या लक्षात आला. यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंजवडी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक डी. एन. निकम तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.