Hinjawadi : मौजमजेसाठी मोबाईल फोन चोरणाऱ्या दोघांना अटक; नऊ मोबाईल जप्त

एमपीसी न्यूज – मोबाईल फोन चोरायचे. चोरलेले फोन विकून येणाऱ्या पैशांनी मौजमजा करायची. असा सपाटा लावलेल्या दोघांना हिंजवडी पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून 74 हजार रुपये किमतीचे 9 मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत.

विकास भाऊसाहेब लहासे (वय 20 रा. थेरगाव. मूळ रा. शेवगाव, जि. अहमदनगर) आणि नागेश बाबू भंडारी (वय 19, रा. वाकड. मूळ रा. गुलबर्गा, कर्नाटक) अशी अटक केलेल्या दोन चोरट्यांनी नावे आहेत.

  • याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाकड येथील भूमकर चौकात ट्रिपलसीट जाणा-या तिघांना हिंजवडी पोलिसांनी अडवले. दुचाकीवरील दोघांचा संशय आल्याने हिंजवडी पोलिसांनी दोघांकडे चौकशी करत त्याचा मोबाईल फोन जप्त केला. जप्त केलेल्या मोबाईल फोनबाबत चौकशी करत असताना तो फोन चोरीचा असून त्याबाबत हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असल्याचे आढळले. या गुन्ह्यासाठी वापरलेली दुचाकी देखील पोलिसांनी जप्त केली आणि विकास व नागेश या दोघांना अटक केली.

त्यानंतर मिळालेल्या पोलीस कोठडीत दोघांनी मिळून नऊ मोबाईल फोन चोरल्याचे सांगितले. पोलिसांनी दोघांकडून नऊ मोबाईल फोन जप्त केले. आरोपींनी हे मोबाईल फोन मौजमजेसाठी वापरले असल्याचे सांगितले. हिंजवडी पोलीस ठाण्यातील दोन चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.