Hinjawadi : वंदना द्विवेदी हत्या प्रकरण; हत्येच्या दिवशी दोघांनी एकत्र जेवण केले, खरेदीही केली, पण…

एमपीसी न्यूज – संशयाचे भूत प्रेयसीच्या (Hinjawadi) हत्येचे कारण बनल्याचे पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत समोर आले आहे. लखनऊ येथून वंदनाला भेटण्यासाठी नव्हे तर तिचा काटा काढण्याच्या हेतूने पुण्यात आलेल्या ऋषभला पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत दोघांनी हत्येच्या दिवशी एकत्र जेवण केले तसेच खरेदी देखील केली आणि त्यानंतर हॉटेलवर येऊन हत्येचा प्रकार घडल्याचे समोर आले आहे.

ऋषभ राजेश निगम (रा. लखनऊ, उत्तर प्रदेश) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. वंदना द्विवेदी (वय 26, रा. हिंजवडी. मूळ रा. लखनऊ, उत्तर प्रदेश) असे खून झालेल्या आयटी अभियंता तरुणीचे नाव आहे. या प्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक सोमनाथ पांचाळ यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

वंदना द्विवेदी आणि ऋषभ निगम हे दोघेही मूळचे लखनऊचे रहिवासी. ते दोघे कॉलेजपासूनचे मित्र होते. मैत्रीचे रूपांतर पुढे प्रेमात झाले. दरम्यान, वंदना नोकरीच्या निमित्ताने हिंजवडी येथे आली. ती एका प्रतिष्ठित आयटी कंपनीत नोकरी करत होती. कंपनीच्या जवळच एका पीजी हॉस्टेलमध्ये ती राहत होती. तर ऋषभ हा लखनऊ येथे रियल इस्टेट कंपनीत ब्रोकरचे काम करत होता.

दोघे फोनवरून एकमेकांच्या संपर्कात होते. मागील काही दिवसांपासून वंदना आपल्यासोबत अपेक्षित संवाद करत नाही, असे त्याला वाटत असे. ती इतर कोणाच्या प्रेमात पडली असल्याची शंका ऋषभ याच्या मनात होती. त्यावरूनच (Hinjawadi) मागील चार वर्षांपासून दोघांमध्ये वाद सुरू होते.

वंदनाला भेटण्यासाठी ऋषभ 25 जानेवारी रोजी हिंजवडी येथे आला होता. त्याने हिंजवडी परिसरातील एका हॉटेलमध्ये 306 नंबरची खोली बुक केली होती. वंदना 26 जानेवारी रोजी ऋषभ याला हॉटेलमध्ये भेटली. त्या दिवशी ती होस्टेलमध्ये परत गेली. ऋषभने दुसर्‍या दिवशी (27 जानेवारी) वंदनाला पुन्हा हॉटेलमध्ये बोलावून घेतले.

27 जानेवारी रोजी दोघांनी एकत्र खरेदी केली, सोबत जेवणही केले. दिवसभर दोघेही एकत्र होते. रात्री साडेनऊच्या सुमारास दोघेही लॉजच्या खोलीत असताना ऋषभने पिस्तुल काढून वंदनाला काही कळायच्या आत तिच्या डोक्यासह शरीरात गोळ्या झाडल्या. वंदना रक्ताच्या थारोळ्यात पडल्यानंतर ऋषभ हा काही घडलेच नाही, अशा आवेशात रात्री दहाच्या सुमारास खोलीचा दरवाजा बंद करून पसार झाला.

तो मुंबई मार्गे लखनऊला पळून जात असताना नवी मुंबई पोलिसांनी लावलेल्या नाकाबंदी दरम्यान ऋषभ याचा संशय आल्याने पोलिसांनी त्याची बॅग तपासली. त्यावेळी बॅग मध्ये पिस्तूल आढळून आले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने हिंजवडी येथे एका तरुणीचा खून केल्याचे सांगितले.

त्यामुळे नवी मुंबई पोलिसांनी पिंपरी चिंचवड पोलिसांशी संपर्क करत खातरजमा केली. त्यानंतर हिंजवडी पोलिसांनी संबंधित हॉटेलमध्ये जाऊन पाहणी केली असता वंदना द्विवेदी रक्ताच्या थारोळ्यात पडलेली आढळली.

आरोपीने ऋषभ निगम याने प्रेमप्रकरण आणि संशयातून आपली प्रेयसी वंदना हीचा खून केला असल्याची प्राथमिक माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. घटनेबाबत सर्व बाजूंनी पोलीस तपास सुरू असल्याचे सहायक पोलीस आयुक्त सतीश माने यांनी सांगितले.

हॉटेलमधील स्टाफलाही नव्हते माहीत –

नवी मुंबई पोलिसांनी माहिती दिल्यानंतर हिंजवडी पोलिसांनी संबंधित हॉटेलमध्ये जाऊन पाहणी केली. त्यानंतर हा खुनाचा प्रकार उघडकीस आला. तोपर्यंत हॉटेल मधील स्टाफला देखील याबाबत कोणतीही माहिती झाली नाही.

वंदनावर झाडल्या पाच गोळ्या –

हिंजवडी पोलिसांनी वंदना हिचा मृतदेह ताब्यात घेत ससून रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी पाठवला. त्यामध्ये वंदना हिच्यावर पाच गोळ्या झाडल्याचे समोर आले आहे. शवविच्छेदन झाल्यानंतर वंदनाचा मृतदेह सोमवारी (दि. 29) नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

तीन फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी

हिंजवडी पोलिसांनी आरोपी ऋषभ निगम याला सोमवारी शिवाजीनगर न्यायालयात हजर केले. गुन्ह्यातील शस्त्र जप्त करणे, आरोपीची वैद्यकिय तपासणी करणे आणि गुन्ह्यामागील हेतू शोधणे यासाठी सरकारी वकिल विजयसिंह जाधव यांनी आरोपीच्या पोलीस कोठडीची मागणी केली. त्यानुसार न्यायालयाने आरोपीला 3 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.