Hinjawadi : बालेवाडीमध्ये सॉफ्टवेअर कंपनीत आग

एमपीसी न्यूज – हिंजवडीजवळ बालेवाडी येथे एका बहुमजली व्यावसायिक इमारतीमध्ये चौथ्या मजल्यावर आग लागली. हे घटना आज, रविवारी (दि. 2) दुपारी तीनच्या सुमारास घडली. आग लागलेल्या ठिकाणी सॉफ्टवेअर कंपनी आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी नसल्याची प्राथमिक माहिती आहे.

अग्निशमन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बालेवाडी चौकात एक बहुमजली व्यावसायिक इमारत आहे. या इमारतीमध्ये चौथ्या मजल्यावर एक सॉफ्टवेअर कंपनी आहे. आज दुपारी तीनच्या सुमारास कंपनीच्या अर्ध्या भागात आग लागली. रविवार असल्याने कंपनीला सुट्टी होती. त्यामुळे कंपनीत कोणी अडकल्याची माहिती अदयाप मिळाली नाही. आगीमुळे प्रचंड धूर झाला.

अग्निशमन विभागाला माहिती मिळताच अग्निशमन विभागाचे दोन बंब घटनास्थळी दाखल झाले. खासगी टँकरच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले आहे. प्रचंड धूर झाल्याने अग्निशमन विभागाच्या जवानांना आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अडचणी आल्या. इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून पार्किंगपर्यंत धुराचे लोट पसरले होते.

जवानांनी श्वसन यंत्राचा वापर करून आगीवर नियंत्रण मिळवले आहे. कंपनीचे मोठे नुकसान झाले असून आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.