Talegaon Dabhade : भूमीपुत्र यांच्या विकासाची भूमिका घेणे गरजेचे – रोहित पवार

एमपीसी न्यूज – महाराष्ट्रातून अनेक औद्योगिक क्षेत्रातील उद्योग, व्यवसाय इतरत्र जात असून ते जाणार नाहीत यासाठी शासकीय पातळीवर आपण प्रयत्न करणार आहे. कंपन्या आणि येथील भूमीपुत्र यांच्या विकासाची भूमिका घेणे गरजेचे आहे. कंपन्यांनी आपला सीएसआर फंड स्थानिक विकासाला द्यावा. राज्यात परिवर्तन झाले असून तीन पक्षांचे महाआघाडीचे सरकार पाच वर्षे काम करेल, असा विश्वास आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केला.

तळेगाव दाभाडे येथील वैशाली मंगल कार्यालयात शनिवारी (दि 1 फेब्रुवारी) सकाळी अकरा वाजता मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यकर्ता मेळावा आणि पदाधिकारी सत्कार समारंभात म्हणून पवार बोलत होते.

यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाअध्यक्ष प्रदीप गारटकर, माजी अध्यक्ष विजय कोलते, जिल्हा बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात, उपाध्यक्ष अर्चना घारे, सहकारी आघाडीचे महाराष्ट्राचे प्रमुख भारव्दाज पगारे, जामखेडचे(नगर) आमदार रोहित पवार, मावळचे आमदार सुनील शेळके, संत तुकाराम कारखान्याचे उपाध्यक्ष बापुसाहेब भेगडे, पुणे जिल्हा परिषद कृषी व पशुसंवर्धन समितीचे सभापती बाबुराव वायकर, जिल्हा परिषदेच्या सदस्या शोभा कदम, कार्याध्यक्ष दिपक हुलावळे, माजी सभापती विठ्ठलराव शिंदे, तालुका अध्यक्ष बबनराव भेगडे, तळेगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष गणेश काकडे, नगरसेवक किशोर भेगडे, संतोष भेगडे, महिला अध्यक्षा सुवर्णा राउत, जिल्हा युवक अध्यक्ष सचिन घोटकुले, माजी नगराध्यक्ष सुरेश धोत्रे, मावळ ग्रामीण ब्लाॅक अध्यक्ष सुभाष जाधव, खादी ग्रामोद्योग संघाचे अध्यक्ष अंकुश आंबेकर, सरपंच सुनील दाभाडे, दत्तात्रय पडवळ, पंचायत समिती सदस्य साहेबराव कारके, तळेगाव शहर महिला अध्यक्षा सुनिता काळोखे, उपाध्यक्षा ज्योती शिंदे, नगरसेविका वैशाली दाभाडे, मंगल भेगडे, ज्येष्ठ नेत्या रूपाली दाभाडे, नगरसेविका संगीता शेळके, मावळ तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष कैलास गायकवाड, तळेगाव शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष आशिष खांडगे आदी मान्यवर उपस्थित होते.

महाविकास आघाडीच्या योजना, पदाधिका-यांनी व कार्यकर्त्यांनी गाव पातळीपर्यंत पोहचवाव्यात, असे आवाहन जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी केले. तर सर्वसामान्यांशी निगडीत असणा-या विविध विकास योजना शासनाकडून मंजूर करून घेऊन त्या प्रत्यक्ष आमलात आणण्यासाठी मी प्रत्यक्ष प्रयत्न करेन तर आतापर्यंत दिर्घ काळ रखडलेल्या विविध योजना प्राधान्याने मार्गी लावण्यासाठी विशेष प्रयत्न करणार आहे.

मावळ तालुक्यात भारतीय जनता पक्षाच्या काळात विकासकामांच्या नुसत्या घोषणा झाल्या. मात्र, तालुका विकासापासून दूर राहिला, अशी खंत माजी मंत्री मदन बाफना यांनी येथे व्यक्त केली.

दरम्यान, आमदार रोहित पवार, सुनील शेळके, पुणे जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती बाबुराव वायकर, जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मला पानसरे, नवनिर्वाचित सरपंच सुनील दाभाडे, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष रोहिदास गराडे व पक्षाचे नवनिर्वाचित पदाधिकारी यांचा सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका अध्यक्ष बबनराव भेगडे यांनी केले तर, सूत्रसंचालन चंद्रजीत वाघमारे व आभार सुभाष जाधव यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.