Hinjewadi News : हिंजवडी आणि तळेगावात झालेल्या दोन अपघातांमध्ये दोघांचा मृत्यू

एमपीसी न्यूज – मुंबई-बेंगलोर महामार्गावर बावधन येथे शनिवारी रात्री साडेसात वाजता अज्ञात वाहनाच्या धडकेत एका बुलेटस्वाराचा मृत्यू झाला. तर शनिवारी रात्री पावणे आठ वाजता जुना पुणे-मुंबई महामार्गावर तळेगाव दाभाडे येथे रस्ता ओलांडणाऱ्या एकाचा दुचाकीच्या धडकेत मृत्यू झाला. याबाबत रविवारी हिंजवडी आणि तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

प्रसाद पांडुरंग पाटील (वय 24, रा. मारुंजी) असे बावधन येथील अपघातात मृत्यू झालेल्या बुलेटस्वाराचे नाव आहे. याबाबत प्रशांत अप्पासाहेब पाटील (वय 42, रा. चिंचवड. मूळ रा. सांगली) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात वाहन चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री साडेसात वाजता मयत प्रसाद आणि त्यांचा मित्र अजय जाधव त्यांच्या बुलेटवरून (एम एच 14 / एच झेड 1199) जात होते. मुंबई-बेंगलोर महामार्गावर बावधन येथे त्यांच्या बुलेटला अज्ञात वाहनाने धडक दिली. त्यात गंभीर जखमी झालेल्या प्रसाद यांचा मृत्यू झाला. अज्ञात वाहन चालक अपघाताची माहिती न देता निघून गेला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

रामजनम मंगरू प्रजापती (वय 56) असे तळेगाव दाभाडे येथील अपघातात मृत्यू झालेल्या पादचारी व्यक्तीचे नाव आहे. सचिन दत्ताराम मयेकर (वय 45, रा. तळेगाव दाभाडे) यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी मोपेड दुचाकी (एम एच 14 / एच जे 8441) चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री पावणे आठ वाजताच्या सुमारास मयत प्रजापती जुना पुणे-मुंबई महामार्गावर तळेगाव दाभाडे येथील लिंब फाटा येथे रस्ता ओलांडत होते. त्यावेळी त्यांना भरधाव वेगात आलेल्या मोपेड दुचाकीने धडक दिली. त्यात प्रजापती गंभीर जखमी झाले. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.