Pimpri : हितेश मुलचंदानी खूनप्रकरणाला राजकीय वळण 

आमदार चाबूकस्वारांकडून मयत तरुणाच्या वडिलांवर दबाव; डब्बू आसवानी यांचा आरोप; चाबूकस्वारांविरोधात अदखलपात्र गुन्हा

एमपीसी न्यूज – पिंपरी कॅम्पातील हितेश मुलचंदानी या तरुणाच्या खूनप्रकरणाला वेगळेच वळण मिळाले आहे. पिंपरीचे आमदार गौतम चाबूकस्वार यांच्याकडून मयत तरुणाच्या वडिलांवर दबाव आणला जात असल्याचा आरोप माजी उपमहापौर डब्बू आसवानी यांनी आज (गुरुवारी) पत्रकार परिषदेत केला. याप्रकरणी चाबूकस्वारांविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, आमदार चाबूकस्वार यांची प्रतिक्रिया समजू शकली नाही. 

याप्रकरणी हिरानंद (डब्बू) किमतराम आसवानी यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार आमदार गौतम चाबुकस्वार, जितू मंगतानी, सुरेश निकाळजे, राजू नागपाल, किशोर केशवानी यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पत्रकार परिषदेत डब्बू आसवानी म्हणाले, हितेश गोदुमल मुलचंदानी या तरुणाचा 23 जुलै रोजी खून झाला. पोलिसांनी या प्रकरणातील पाच आरोपींना अटक केली. एक आरोपी फरार आहे. पोलीस त्याच्या मागावर आहेत. असे असताना आमदार गौतम चाबुकस्वार आणि त्यांच्या साथीदारांनी माझी प्रतिमा बदनाम करण्याच्या उद्देशाने हितेश मुलचंदानी याचे वडील गोदुमल यांच्यावर न्यायालयात माझ्याविरोधात साक्ष देण्यासाठी दबाव आणत आहेत.

गोदुमल आणि माझे कौटुंबिक संबंध आहेत. हितेश मला मुलासारखा होता. त्याचं सतत माझ्या घरी येणं-जाणं असायचं. पण गोदुमल यांना आमदार चाबुकस्वार माझ्याविरोधात भडकावत आहेत. डब्बू आसवानी यांचा हितेशच्या खून प्रकरणात हात असल्याचा पुरावा असून तो पाहण्यासाठी कार्यालयात येण्याची गळ आमदार आणि त्यांच्या साथीदारांकडून घातली जात आहे. यामुळे गोदुमल मुलचंदानी आणि माझे कुटुंब प्रचंड तणावाखाली आहे, अशा संवेदनशील विषयात आमदार राजकारण आणत आहेत.”

हितेशचे वडील गोदुमल मुलचंदानी म्हणाले, आमदार चाबुकस्वार आणि किशोर केसवानी यांचा मला फोन आला. हितेशच्या खून प्रकरणात डब्बू आसवानी यांचा हात आहे. त्याचा पुरावा माझ्याकडे आहे. कार्यालयात येऊन भेट, मी पुरावा दाखवतो, असे मला फोनवर सांगण्यात आले. आमचे डब्बू आसवानी यांच्यासोबत घरचे संबंध आहेत. माझ्या मुलाचं त्यांच्या मुलांसोबत उठणं-बसणं होतं. मुलाच्या जाण्याने मी अत्यंत दुःखात आहे. यामध्ये राजकारण आणू नका. आरोपींना फाशीची शिक्षा देऊन मला न्याय द्या, असेही ते म्हणाले.

याबाबत आमदार गौतम चाबूकस्वार यांची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न केला. पंरतु, त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. त्यांची बाजू समजल्यास बातमीमध्ये अॅड केली जाईल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like