11th HI Sr. Men Natl C’hip 2021 :  राष्ट्रीय हॉकीत पंजाब विजेते!

एमपीसी न्यूज – हॉकी इंडियाच्या 11व्या वरिष्ठ गटाच्या राष्ट्रीय हॉकी स्पर्धेत हॉकी पंजाबने विजेतेपद मिळविले. चुरशीच्या झालेल्या अंतिम लढतीत त्यांनी उत्तर प्रदेशाचा शूट आऊट मध्ये 2-1 असा पराभव केला.

नियोजित वेळेत दोन्ही संघ गोलशून्यची बरोबरी तोडू शकले नाहीत. त्यानंतर घेण्यात आलेल्या शूट आऊटमध्ये पंजाबने बाजी मारली. पंजाबकडून विशाय यादव, मेहकीत सिंग, तर उत्तर प्रदेशकडून केवळ महंमद अमीर खान यालाच गोल करण्यात यश आले.

पंजाकडून रणजोत सिंग, सिंग हरताज औजला यांना गोलरक्षकाला चकवण्यात अपयश आले. उत्तर प्रदेशाकडून अजय यादव, महंमद सादिक, महंमद सैफ खान आणि तरुण अधिकारी हे खेळाडू आपल्या संधी साधू शकले नाहीत.

त्यापूर्वी, तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या सामन्यात कर्नाटकाने यजमान महाराष्ट्राचा 5-2 असा पराभव केला. कर्नाटकाने सामन्याला आक्रमक सुरवात केली. सामन्याच्या तिसऱ्याच मिनिटाला यतिश कुमार याने गोल करताना महाराष्ट्राचा गोलरक्षक आकाश चिकटेला चकवले.

त्यानंतर दोन मिनिटांनी अशीच कामगिरी करत कर्णधार महंमद राहिलने गोल करून कर्नाटकाची आघाडी भक्कम केली. महाराष्ट्राचा कर्णधार तालेब शाह याने 24व्या मिनिटाला गोल करून महाराष्ट्राचे आव्हान कायम राखले होते. मध्यंतराला कर्नाटकाने 2-1 अशी आघाडी राखली.

उत्तरार्धानंतर तालेबने आणखी एक गोल करून सामन्यात 2-2 अशी बरोबरी राखली. उत्तरार्धाची सुरवात महाराष्ट्रासाठी आश्वासक झाली असली, तरी त्यानंतर सामन्यावर कर्नाटकाचे पूर्ण वर्चस्व राखले. बरोबरीनंतर सामन्याच्या 37व्या मिनिटाला पवन मदिवलार याने कर्नाटकाला पुन्हा आघाडीवर नेले. सोमण्णा एन. डी याने 45व्या मिनिटाला आघाडी भक्कम केली आणि 52व्या मिनिटाला लिखित बीएम याने गोल करून कर्नाटकाचा विजय साकार केला.

निकाल –

  • हॉकी पंजाब 0 (2) (शूट आऊटमध्ये विशाल यादव, मेहकीत सिंग) शूट आऊट उत्तर प्रदेश 0 (1) (शूटआऊटमध्ये मोहंमद अमीर खान)
  • हॉकी कर्नाटक 5 (यतिश कुमार 3रे, मोहंमद राहिल 5वे, पवन मदिवलार 37वे, चिरंथ सोमण्णा एन.डी. 45वे, लिखिथ बीएम 52वे मिनिट) वि.वि. महाराष्ट्र 2 (तालेब शाह 24वे, 33वे मिनिट) मध्यंतर 2-1

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.