Talegoan : वाढीव करआकारणीचा फेरविचार न केल्यास तीव्र आंदोलन – सुनील शेळके

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या सभागृहात ठराव झाल्याप्रमाणे कर आकारणी न करता, प्रशासनाकडून वाढीव कर आकारणीच्या नोटीसा नागरिकांना पाठविण्यात आल्या असून त्याबाबत तातडीने फेरविचार करावा, अन्यथा शहरातील सर्व नागरिकांसोबत तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा ज्येष्ठ नगरसेवक व माजी उपनगराध्यक्ष सुनील शंकरराव शेळके यांनी दिला आहे. 

तळेगाव दाभाडे नगरपरिषद हद्दीतील मिळकतधारकांना 2018 ते 2022 या चार वर्षांसाठी कर मूल्यांकन सूचना बजावण्यात आली आहे. त्यात पूर्वीच्या करामध्ये दुप्पट ते तिप्पट वाढ करण्यात आल्याने नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. या करमूल्यांकनाबाबत सूचना व हरकती नोंदविण्यासाठी नागरिकांना 28 नोव्हेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर सुनील शेळके यांनी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी वैभव आवारे यांना आज लेखी निवेदन दिले. त्यात वरील इशारा देण्यात आला आहे.
मुख्याधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात शेळके यांनी म्हटले आहे की, तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या विशेष सर्वसाधारण सभेत 2017-18 च्या करआकारणीबाबत सभागृहाने घेतलेल्या निर्णयापेक्षा नागरिकांना प्रशासनाने बजावलेल्या नोटीसांमधील करआकारणी जादा आहे. त्याबाबत शहरातील असंख्य नागरिकांच्या मोठ्या प्रमाणात तक्रारी येत आहे. कर कमी करण्यासाठी प्रशासकीय अधिकारी आर्थिक मागणी करत असून नागरिकांना नाहक त्रास देत अाहेत, अशी गंभीर तक्रारही नागरिक करीत आहेत. सभागृहाच्या ठरावानुसार प्रशासनाने करआकारणी केली नसल्याचे आढळून येत आहे. त्याबाबत तातडीने करआकारणीचा फेरविचार करावा, अन्यथा शहरातील नागरिकांसोबत यासंदर्भात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.